परभणी : शहरातील मुख्य चौकांमध्ये आणि रस्त्यांवर लावलेले अनधिकृत होर्डिंग्ज महानगरपालिकेने हटविले आहेत.
शहरात जागोजागी अनधिकृतरीत्या होर्डिंग्ज लावले होते. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले होते. याशिवाय अनधिकृत होर्डिंग्ज लावल्यामुळे महानगरपालिकेच्या उत्पन्नातही घट होत होती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर महापौर अनिता सोनकांबळे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या बैठकीत होर्डिंग्जविषयी चर्चा झाली. त्यानंतर सर्व अनधिकृत होर्डिंग्ज काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार दोन दिवसांपासून शहरात होर्डिंग्ज काढण्याची मोहीम मनपा प्रशासनाने राबविली. शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज काढून घेण्यात आले आहेत.
मनपाची परवानगी न घेता मिळेल त्या जागेवर होर्डिंग्ज उभारल्याने हे होर्डिंग्ज वाहनधारकांसाठी धोकादायक ठरले होते. सोसाट्याच्या वाऱ्याने कधी होर्डिंग्ज जमीनदोस्त होण्याची भीती निर्माण झाली होती. मनपाने होर्डिंग्ज हटविल्यामुळे हा धोका आता टळला आहे. यापुढे विना परवानगी होर्डिंग्ज लागणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
महापौर अनिता सोनकांबळे यांनी दिल्या सूचना
शहरातील अनधिकृत होर्डिंग्जच्या विषयावर महापौर अनिता रवींद्र सोनकांबळे यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. याप्रसंगी उपमहापौर भगवान वाघमारे, स्थायी समितीचे सभापती गुलमीर खान, उपायुक्त प्रदीप जगताप, रवींद्र सोनकांबळे, अमोल जाधव आदींची उपस्थिती होती. शहरात मुख्य रस्त्यावर लागलेले विना परवानगी होर्डिंग्ज काढून घेण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. तत्पूर्वीच आयुक्त देवीदास पवार यांनीही यासंदर्भाने आदेश दिले होते.
शहरातील होर्डिंग्ज तात्काळ काढून घ्यावेत, अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा. ज्या मालकांनी होर्डिंग्ज लावलेले त्यांनी ज्या ठिकाणी होर्डिंग्ज तयार केले. तेथील मशीन सील करण्याची नोटीस द्यावी. ना-हरकत प्रमाणपत्र रद्द करावे, अशा सूचना अनिता सोनकांबळे यांनी यावेळी दिल्या. त्याचप्रमाणे अनधिकृत होर्डिंग्ज लागल्यामुळे महानगरालिकेचा महसूल बुडाला आहे. तेव्हा मालमत्ता विभागाने तात्काळ निविदा प्रक्रिया पूर्ण करावी, नागरिकांना वाहतुकीसाठी त्रास होणार नाही, याची काळजी घेत सर्व्हे करावा, घरावर लागलेल्या होर्डिंग्जची तपासणी करावी व निविदा काढल्यानंतरच त्यांना होर्डिंग्ज लावण्याची परवानगी द्यावी, अशा सूचना उपहामौर भगवान वाघमारे यांनी दिल्या आहेत. यावेळी सभापती गुलगीर खान यांनीही अधिकाऱ्यांना सूचना केल्या. शहरातील सर्व होर्डिंग्ज काढल्यानंतर बैठक घेऊन नव्याने निविदा काढण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. याप्रसंगी सहायक आयुक्त श्रीकांत कांबळे, वाघमारे, मालमत्ता व्यवस्थापक नसीर काजी, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, विकास रत्नपारखे, मेहराज अहमद, लक्ष्मण जोगदंड, न्यायरत्न घुगे, कर अधीक्षक अलकेश देशमुख, इमात शाह, रिजवान पठाण आदींनी उपस्थिती होती.