मानवत : शहरातील फुलेनगरात राहणाऱ्या ४३ वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना रविवारी रात्री ९:३० वाजता उघडकीस आली. या प्रकरणी २२ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील फुलेनगरात तबस्सुम बडेशहा शेख (वय ४३) ही महिला आपल्या मालकीच्या घरात एकटी राहत होती, तसेच ही महिला मागील काही वर्षांपासून वेश्या व्यवसाय करीत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. २१ फेब्रुवारी रोजी रात्री ८च्या सुमारास शेजारी राहणारी महिला तबस्सुमबरोबर बोलण्यासाठी गेली असता, ती जमिनीवर संशयास्पद अवस्थेत पडलेली त्यांना दिसली. नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर सपोनि भरत जाधव, जमादार अनिल केंद्रे, नारायण सोळंके, महिला पोलीस कर्मचारी सविता भारशंकर, निर्मला गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. घरातील खोलीची पाहणी केली असता, तबस्सुम खोलीमध्ये मृतावस्थेत आढळून आली, तसेच तिच्या खोलीमधील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळून आल्याने घातपात झाल्याचा संशय पोलिसांना आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण केले. श्वानपथकाने पशुवैद्यकीय दवाखाना मुख्य रस्त्यापर्यंत माग काढल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी सपोनि भरत जाधव यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रमेश स्वामी करीत आहेत.