परभणी: सातारा जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तीकडून पैशाची लूटमार करण्यासाठी जिंतूर बसस्थानक परिसरात त्याचा खून केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा सुगावा लावण्यासाठी तपासाची चक्र वेगाने फिरवली अन् अवघ्या बारा तासाच्या आत जिंतूर मधील तिघा जणांना ताब्यात घेतले.
जिंतूर येथील बसस्थानक परिसरात २१ सप्टेंबर रोजी सकाळी एका ४० वर्षे इसमाचा मृतदेह आढळला होता. या इसमाचा खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी लावला. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत शोध घेतला असता मयताचे नाव महेंद्र यशवंत सावंत (राहणार वाघजाई वाडी,जि. सातारा) असे असल्याचे समजले. मयताच्या भावाशी संपर्क केला असता त्याने महेंद्र हा महिनाभरापूर्वी कामासाठी जातो, म्हणून घराबाहेर पडला असल्याचे सांगितले. तेव्हापासून त्याचा संपर्क झाला नव्हता. २० सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास महेंद्र सावंत हा जिंतूर बसस्थानकातील झुडपांकडे गेला होता. त्याच्या मागे तीन जण गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत पोलिसांनी शेख मुसेफ शेख मोसीन (२१), भारत आसाराम पहारे (२८), राजेश पांडुरंग शिंदे (३०) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी महेंद्र सावंत यांच्या जवळील पैसे काढून घेण्यासाठी त्याला मारल्याची कबुली दिली. अवघ्या बारा तासात पोलिसांनी गुन्हा उघड केला. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, अनिरुद्ध काकडे, गोपीनाथ वाघमारे, अजित बिरादार,विलास सातपुते, सिद्धेश्वर चाटे, विष्णू चव्हाण, नामदेव दुबे, मधुकर ढवळे, संजय घुगे यांच्या पथकाने केली.