परभणी : जुन्या वादातून एका युवकाचा खून केल्याप्रकरणी येथील जिल्हा न्यायालयाने १८ फेब्रुवारीला तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
येथील वांगी रोडवरील साईबाबा नगरात १३ डिसेंबर २०१५ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास अजहर मसियोद्दीन याच्यासोबत शेतात पाणी देण्याच्या पाईपवरून आरोपींचा वाद झाला. या वादानंतर आरोपी रईसोद्दीन याने घरी जाऊन त्याचे वडील अमिरोद्दीन आणि आई रौफाबी ऊर्फ गौरीबी, भाऊ अकबरोद्दीन यांना घेऊन परत आखाड्यावर आला. शेतातील जुन्या वादाचा राग मनात धरून रईसोद्दीन ऊर्फ गुड्डू याने अजहर यास चाकूने भोसकले. त्यात तो जागीच ठार झाला.
मसियोद्दीन हे अजहर यास वाचविण्यासाठी आले असता आरोपी अमिरोद्दीन याने त्यांच्या पोटात तलवार मारून गंभीर जखमी केले तर आरोपी गौरीबी हिने लोखंडी पाईपने अजहर यास डोक्यात मारहाण केली, अशी तक्रार खिजर मसियोद्दीन यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यावरुन नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस निरीक्षक सुधाकर जगताप यांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात फिर्यादी खिजर यांनी विधि व न्याय विभाग मुंबई येथे विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून सुभाषराव देशमुख हट्टेकर यांची खटला चालविण्यासाठी नियुक्ती करावी, अशी विनंती केली होती. त्यानुसार सरकारी अभियोक्ता म्हणून सुभाषराव देशमुख यांनी नियुक्ती करण्यात आली होती.
या प्रकरणात १८ फेब्रुवारीला जिल्हा व सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे १९ साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्ष घटना पाहणारे साक्षीदार व जखमी साक्षीदार, परिस्थितीजन्य पुरावा आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यास पुरेसा आहे, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील सुभाषराव देशमुख हट्टेकर यांनी केला. या प्रकरणातील आरोपी अमिरोद्दीन याचे खटला सुरू असताना निधन झाले. त्यामुळे न्या.ओंकार देशमुख यांनी सुनावणीअंती इतर तिन्ही आरोपींना कलम ३०२ अन्वये जन्मठेप व १० हजार रुपये दंड, कलम ३०७ भा.दं.वि. अन्वये सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सुभाषराव देशमुख व ॲड. टी. एम. फारोखी यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. मनाळे, अंमलदार प्रमोद सूर्यवंशी, सहायक पोलीस उपनिरीक्षक डी.जी. गायकवाड यांनी काम पाहिले.