परभणी : उसने दिलेले पैसे परत घेऊन पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून प्रेयसीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. परभणी शहरातील मदिनापाटी परिसरात शनिवारी पहाटे ही घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.सुनीता लक्ष्मण धुमाळ (३०) असे मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी महिलेची भावजय निकीता आकाश पवार यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सुनीता धुमाळ आणि अजहर कुरेशी यांचे प्रेमसंबंध होते. काही महिन्यांपूर्वी अजहर कुरेशी याने सुनीताकडून ६० हजार रुपये उसने घेतले होते. त्यातूनच दोघांमध्ये वादही निर्माण झाला होता. याच कारणातून १ जुलै रोजी अजहर कुरेशीने सुनीता हिला मारहाण केली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला होता. त्यानंतर ३ जुलै रोजीही मारहाण केली होती. परंतु, अजहर कुरेशी याने उसने केलेले पैसे परत केल्याने सुनीताने या प्रकरणात तक्रार दिली नाही. त्यानंतर १० जुलै रोजी परत शिवीगाळ करुन सुनीताला मारहाण करण्यात आली. या प्रकरणातही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. दरम्यान, ४ आॅगस्ट रोजी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास गच्चीवरुन ओरडण्याचा आवाज आल्याने मी जागी झाले. जावून बघितले असता सुनिता हिला मारहाण झाली होती. अजहर कुरेशी व इतर तिघांनी ही मारहाण केली. त्यातच तिचा मृत्यू झाला. ६० हजार रुपये परत का मागितले आणि पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केल्याच्या कारणावरुन सुनीता हिला मारहाण करुन जीवे मारले, असे निकीता पवार यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यावरुन नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी तपास करीत आहेत.
पोलिसांत तक्रार दिली म्हणून प्रेयसीचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2018 6:10 AM