तकीया मोहल्ला भागातील अख्तर जलील शहा या युवकाचा ६ फेब्रुवारी रोजी खून झाला होता. या घटनेत ताडबोरगाव शिवारात युवकाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी ४० ते ५० जणांची केली असून त्यात काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे ११ महिन्यांनंतरही अख्तर शहा यांचे खून प्रकरण चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याचे दिसत आहे.
अख्तर जलील शाह (वय ३०) हा वाहनचालक होता. तो या व्यवसायासह शहरातील एका सिमेंट दुकानावर हमालीचेेेे काम करायचा. ५ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेपासून ॲपे ऑटोचे भाडे घेऊन जात असल्याचे सांगून तो घरातून निघाला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी आला नसल्यामुळे नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र, त्याचा शोध न लागल्याने तन्वीर जलील शाह यांनी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ठाण्यात अख्तर हरवल्याची नोंद केली होती. पोलिसांनी शोध सुरू केला असता अख्तर जलील शाह याचे वाहन (क्र.एम एच ३८/ पी १०३५) ताडबोरगावजवळ आढळले. त्यावरून या भागात शोध घेतला तेव्हा राष्ट्रीय महामार्गापासून ५०० मीटर अंतरावर ताडबोरगाव शिवारातील पेट्रोलपंपाजवळ एका शेतात अख्तर शहा या युवकाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. त्याच्या डोक्यावर दोन ते तीन घाव दिसून आले. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ४० ते ५० जणांची चौकशी मानवत पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही या खुनाचे रहस्य उलगडले नाही. तसेच अख्तरच्या कॉल डिटेल्सच्या आधारेही काही जणांची चौकशी करण्यात आली. मात्र, यामध्येही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे या खून प्रकरणाचे गूढ कायमच आहे.
तातडीने तपास करा
अख्तर शहा याच्या खुनाचा तपास तातडीने लावा, अशी मागणी १३ जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्याकडे कुटुंबीयांनी केली आहे. तापसिक अंमलदार या गुन्ह्याची गंभिरता कमी करत असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. निवेदनावर मयत अख्तर शहाचे बंधू रऊफ शहा, जलील शहा, लतीफाबी शहा, रिजवानाबी शहा यांच्या सह्या आहेत.