लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड: येथील बसस्थानक परिसरातून वाहणारा सांडपाण्याचा नाला तुंबल्यामुळे त्यातील घाण पाणी चक्क बसस्थानकातून वाहत आहे. त्यामुळे बसस्थानकाला तळ्याचे स्वरुप आले असून, दुर्गंधीयुक्त घाण पाण्यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
रेल्वे उड्डाणपुलाच्या कामात अडथळा ठरणारे नगरपालिकेचे व्यापारी संकुल सार्वनजिक बांधकाम विभागाने जमीनदोस्त केले. त्यामुळे याठिकाणी पडलेले साहित्य जैसे थे आहे. या परिसरातून वाहणाऱ्या नाल्यामध्ये हे साहित्य मोठ्या प्रमाणात जमा झाले आहे. परिणामी हा नाला तुंबला असून, त्यातील घाण पाणी बसस्थानकातून वाहत आहे. गुरुवारी या नाल्यातील घाण व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे बसस्थानकाला तळ्याचे स्वरुप आले होते. या पाण्यातूनच मार्ग काढत प्रवाशांना बस पकडावी लागत होती. या दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. याबाबत प्रवाशांनी वारंवार स्थानक प्रमुखांकडे व स्थानकप्रमुखांनी अनेकदा नगरपालिकेकडे याबाबत तक्रारीही केल्या आहेत. मात्र, नगरपालिका प्रशासनाला अद्यापही जाग आलेली नाही. प्रवाशांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी नगरपालिकेने तातडीने या नाल्यातील तुंबलेली घाण साफ करावी व पाण्याला वाट मोकळी करून द्यावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
पत्रव्यवहाराला केराची टोपली
सांडपाणी वाहून नेणारा नाला बसस्थानकाजवळच तुंबल्याने प्रवाशांना त्यातील घाण पाण्याचा व दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे सांडपाणी इतरत्र वळवावे, यासाठी स्थानकप्रमुख विजय पुरी व हडबे यांनी नगरपालिका कार्यालयात वारंवार पत्रव्यवहार केला. तसेच मुख्याधिकारी पंकज पाटील, स्वच्छता विभागप्रमुख वसंत वाडकर यांची प्रत्यक्ष भेट घेत ही समस्या सोडविण्याची विनंती केली. मात्र, पालिका प्रशासनाने एस. टी. महामंडळाच्या पत्रव्यवहाराला केराची टोपली दाखवल्याचे आगारप्रमुख किशनराव कऱ्हाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.