परभणी : नांदेड येथून धावणारी नांदेड- मुंबई ही रेल्वे दररोज धावण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दक्षिणमध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी दिले.
परळी येथील रेल्वे स्थानकाची तपासणी करण्यासाठी सोमवारी यादव परळी दौऱ्यावर आले होते. याचवेळी त्यांनी परभणी रेल्वे स्थानकाचीही पाहणी केली. मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यादव यांची भेट घेऊन रेल्वे प्रवाशांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. नांदेड- मुंबई ही रेल्वेगाडी दररोज करावी, नांदेड- नगरसोल अशी डेमो रेल्वे सुरु करावी, मराठवाडा एक्सप्रेस या गाडीला २ डबे वाढवून घ्यावेत, पनवेल एक्सप्रेस दररोज करावी, पुण्यासाठी मनमाडमार्गे नियमित रेल्वेसेवा करावी, महिन्याभरापासून बंद केलेली पंढरपूर गाडी सुरु करावी. तसेच मिरज- परळी ही रेल्वे परभणीपर्यंत करावी आदी मागण्या त्यांच्याकडे करण्यात आल्या.
बहुतांश मागण्यांविषयी यादव यांनी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी नांदेड विभागाचे विभागीय व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा यांचीही उपस्थिती होती. मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेचे अरुण मेघराज, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, राजेंद्र मुंडे, रविंद्र मुथा, प्रवीण थानवी, बालासाहेब मोहिते, अॅड.पुरुषोत्तम अटल, श्रीकांत गडप्पा आदींनी यादव यांना निवेदन दिले.