परभणी शहरात व जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले. महापालिकेच्या वतीने सध्या १२ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविली जात आहे. यामध्ये हेल्थ वर्कर, फ्रंटलाइन वर्कर, ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिक व मध्यंतरी १० ते १२ दिवस १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण करण्यात आले. शहराची लोकसंख्या तीन लाख २१ हजार एवढी आहे. यातील शून्य ते १८ वयोगटातील अंदाजे ५० हजार मुले-मुली वगळता उर्वरित २ लाख ६० हजार नागरिकांचे लसीकरण होणे अपेक्षित आहे. मात्र, मागील सहा महिन्यांत १४ जूनपर्यंत शहरातील सर्व केंद्रांवर व काही खासगी रुग्णालये मिळून ६२ हजार ७० जणांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये लसीकरण पूर्ण करण्यात आलेली टक्केवारी केवळ २३.८७ झाली आहे.
लसीकरण कमी होण्याचे कारण
शहरात सुरुवातीला ९ लसीकरण केंद्रे होती तर तीन खासगी रुग्णालये होती. यानंतर सध्या १२ केंद्रे आणि ३ कॅम्प लावण्यात आले आहेत. परंतु, लसीचा दररोज उपलब्ध होणारा कमी-अधिक साठा आणि अपॉइंटमेंट सेशनमध्ये येणारी तांत्रिक अडचण याचा परिणाम लसीकरणावर होत आहे. तसेच थेट केंद्रावर गेल्यावर अनेकदा रजिस्ट्रेशन न होणे यामुळे अनेक जण लसीपासून वंचित राहत आहेत. सध्या अनेक नागरिकांचा कल लस घेण्याकडे नसल्याने काही केंद्रांवर लसीचे डोस दररोज वाया जात आहेत.
केवळ २४ टक्के लसीकरण
शहराची लोकसंख्या तीन लाख २१ हजार एवढी आहे. यातील शून्य ते १८ वयोगटातील अंदाजे ५० हजार मुले-मुली वगळता उर्वरित २ लाख ६० हजार नागरिकांचे लसीकरण होणे अपेक्षित आहे. मात्र, मागील सहा महिन्यांत १४ जूनपर्यंत केवळ ६२ हजार ७० जणांचे लसीकरण करण्यात आले. याची टक्केवारी केवळ २३.८७ झाली आहे.
आशा वर्करचा सर्वे सुरू
शहरात मागील आठ दिवसांपासून प्रभागनिहाय आशा वर्कर यांना घरोघरी जाऊन लसीकरण झालेले व राहिलेले नागरिक यांचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या आठ दिवसांनी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्यावर या सर्व्हेचा वापर करून राहिलेल्या नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे.
- डॉ. कल्पना सावंत, वैद्यकीय अधिकारी, मनपा.
शहरात सर्वांत जास्त लसीकरण झालेली केंद्रे
जायकवाडी रुग्णालय ११,४६०
इनायत नगर ८,८९०
खानापूर केंद्र ६,९८८
खंडोबा बाजार ५,०५७
साखला प्लॉट ४,८७८
शहरात सर्वांत कमी लसीकरण झालेली केंद्रे
शंकर नगर ४,४८०
दर्गा रोड २,००३
वर्मा नगर १,५६२
इंदिरा गांधी कॅम्प ९७
जिल्हा रुग्णालयात झालेले लसीकरण
जिल्हा रुग्णालय कोव्हॅक्सिन ४,७९७
जिल्हा रुग्णालय कॅम्प दोन २,६१५
जिल्हा रुग्णालय कोविशिल्ड ४,८९३
पोलीस रुग्णालय ७५६
सर्व खासगी रुग्णालये ३,६५८