सोनपेठ ( परभणी ) , दि. 12 : नरवाडी गावातील अवैध दारू विक्री मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. याबाबत पोलीस व महसूल प्रशासन यांना सातत्याने निवेदन देऊनही ती बंद झाली नव्हती. यामुळे आता दारूबंदीसाठी गावातील महिलाच सरसावल्या असून त्यांनी आज अवैध दारू विक्री अड्ड्यावर मोर्चा काढला.
गावातच दारू सहज उपलब्ध झाल्याने तरूणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे. दारूमुळे आरोग्याच्या समस्यांसोबत घरगुती वाद्सुद्धा वाढत आहेत. याचा थेट परिणाम गावातील महिलांवर होत आहे. यामुळे गावात सुरुवातीला प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आली. यानंतर पोलीस, महसुल प्रशासन व जिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आले. याचा काहीही परिणाम न होता गावात सर्रास दारू विक्रीसुरुच होती.
यावर निर्वाणीचा तोडगा काढत गावातील महिलांनी आज दारू विक्री करणा-या अड्ड्यावरच हल्ला बोल करत मोर्चा काढला. महिलांनी पुढाकार घेतल्याने मोर्चात सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, छावा संघटना, शेकाप, राजे शिवाजी मंडळ आदी संघटना सहभागी झाल्या.