ऑनलाइन लोकमतराणीसावरगाव (जि. परभणी ), दि. 16 - येथील एका लग्न सोहळ्यात नवरदेवाची निघालेली वरात लग्न मंडपात जाण्यापूर्वी थेट मतदान केंद्रात पोहचली आणि नवरदेवाने लग्ना अगोदर मतदानाचा हक्क बजावल्याची घटना दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली.
गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील व्यापारी मारोतीअप्पा धुळे यांचे चिरंजीव अमोल धुळे यांचा १६ फेब्रुवारी रोजी १२.४० वाजता विवाहाचा मुहूर्त ठरला होता. त्यानुसार १६ रोजी धुळे कुटुंबियांकडून लग्नाची सर्व तयारी झाली. दुपारी १२ वाजेच्या सुमारास वरात काढून लग्नविधी संपन्न करण्याची नातेवाईकांकडून तयारी सुरु असतानाच अमोल धुळे यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आजच मतदान असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी लग्नविधी अगोदर मतदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी नातेवाईकांना मतदान केंद्रावर चलण्याची विनंती केली. सर्वच नातेवाईक यासाठी तयार झाले व घोड्यावर बसून वाजत-गाजत ही वरात गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्राजवळ येऊन थांबली. अचानक वरात मतदान केंद्रावर थांबल्याने उपस्थित ग्रामस्थही संभ्रमात पडले. त्यानंतर नवरदेव अमोल धुळे हे घोडयावर उतरुन मतदान केंद्राकडे जावू लागले. त्यावेळी सर्वांना मतदानासाठी नवरदेवाची वरात केंद्राजवळ आली असल्याचे लक्षात आले. नवरदेव अमोल केंद्राजवळ आल्यानंतर त्यांचे केंद्राध्यक्षांनी स्वागत केले व उपस्थित मतदारांनीही रांग तोडून त्यांना मतदान करण्याचा मार्ग मोकळा करुन दिला. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अमोल धुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ही वरात मारोती मंदिर परिसरात आली. येथे मारोतीचे दर्शन घेतल्यानंतर लग्नसोहळा मंडपात संपन्न झाला. लग्नाच्या व्यस्त कार्यक्रमातही नवरदेव अमोल धुळे यांनी राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल याबाबत सर्वत्र सकारात्मक चर्चा दिसून आली.