परभणी : ड्रग्ज प्रकरणात स्वत:चा जावई अडकल्याने आणि या प्रकरणातून सरकार जाण्याची चाहूल लागल्यानेच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ( Nawab malik ) शाहरुख खानची ( Shaharukh Khan ) वकिली करीत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील गुरुवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, राज्य सरकारमधील नेते सध्या ‘खोटे बोल पण, रेटून बोल’ याप्रमाणे मनाला येईल त्याप्रमाणे बोलत आहेत. नवाब मलिक यांचे जावई ड्रग्ज प्रकरणात अडकल्याने त्यांनी या प्रकरणात वकिलीच सुरू केली असल्याचा आरोप त्यांनी केला.
काय केले मलिकांनी आरोप ?
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा कायम आहे. नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा समीर वानखेडे आणि त्यांच्या बहिणीवर गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे आणि त्यांच्या बहिणीने मालदीव आणि दुबईमध्ये बॉलिवूड कलाकारांकडून वसुली केली, असा आरोप मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक म्हणाले की, कोरोना काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही तिकडे उपस्थित होते. समीर वानखेडे दुबई, मालदीवमध्ये होते का? त्यांची लेडी डॉन मालदीवमध्ये गेली होती का? याचं उत्तर मिळणं अपेक्षित आहे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.