सोनपेठ (परभणी ) : तालुक्यातील करम येथील महावितरण उपकेंद्राच्या गलथान कारभारविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.
महावितरणने करम येथील शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. शेतातील कृषी पंप व घरगुती वापरासाठी देखील व्यवस्थित वीज पुरवठा सुरळीत नाही. यामुळे या फिडर अंतर्गत असलेल्या वडगाव, वैतागवाडी, निळा, वंदन, मरगळवाडी, बनवडी, वैतागवाडी तांडा, उंदरवाडी तांडा, करम, उक्कडगाव, उखळी, पारधवाडी, नैकोटा, भुक्तरवाडी, कारबेटवाडी, लोकरवाडी, नखतवाडी आदी गावांतील ग्रामस्थ त्रस्त आहेत.
याविरोधात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे महावितरणाच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. यावेळी या भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, लोबंकळणा-या, जीर्ण झालेल्या तारा, वाकलेले खांब तसेच फ्यूज दुरुस्त करण्यात यावेत. वैतागवाडी तांडा व उंदरवाडी तांडा येथे सिंगल फेज चा वीज पुरवठा देण्यात यावा. फिडरवरील गंगाखेड तालुक्यातील 6 गावांचा पुरवठा बंद करावा आदी मागण्या करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन तहसीलदार जिवराज डापकर, महावितरणचे अभियंता कांबळे यांना देण्यात आले. आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, दशरथ सुर्यवंशी तालुका प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस, विठ्ठलराव सुर्यवंशी, रामभाऊ बेद्रे, विष्णूपंत धोंडगे, श्रीकांत मोरे, राजेभाऊ जाधव यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.