परभणी : राष्ट्रवादीचे माजी खा. गणेश दुधगावकर यांना जमीन फसवणूक प्रकरणात अटक ; परभणीतील नानलपेठ पोलिसांनी ही कारवाई केली.ज्ञानोपासक महाविद्यालय कर्मचारी गृहनिर्माण सोसायटीच्या जमीन फसवणूक प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
दुधगावकर यांना त्यांच्या परभणी तालुक्यातील पोखरणी येथील घरातून सकाळी 6 वाजता पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना परभणीत नानलपेठ ठाण्यात आणण्यात आले. येथे वैद्यकीय तपासणी नंतर सकाळी 9.45 वाजता त्यांना अटक करण्यात आली.
ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण सोसायटीच्या जमीन फसवणूक प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी तत्कालीन तलाठी दत्तात्रय कदम याला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण :
१६ डिसेंबर २०१७ रोजी सेवानिवृत्त प्राचार्य बाबुराव सुंदरराव सोळंके यांच्या फिर्यादीवरुन माजी खा.गणेशराव दुधगावकर, दत्तात्रय कदम, रावसाहेब भागुजी पाटील, निवत्त मंडळ अधिकारी तुकाराम पवार, निवृत्त नायब तहसीलदार वि.गो. गायकवाड आणि निवृत्त मंडळ अधिकारी विजय कुलथे यांच्याविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या फिर्यादीनुसार ज्ञानोपासक महाविद्यालयातील सुमारे १३५ कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन गृहनिर्माण सोसायटी स्थापन केली. त्यानंतर सुंदरलाल सावजी जिंतूर अर्बन को-आॅप बँकेकडून या सर्वांनी कर्ज घेऊन संस्थेच्या नावे पाथरीरोडवरील कॅनॉल परिसरात सर्व्हे नं.६१३ मध्ये १६ एकर ८ गुंठे जमीन घरे बांधण्यासाठी मुख्य प्रवर्तक नारायण माधवराव बुलंगे यांच्या नावे खरेदी केली.
त्यानंतर माजी खा.गणेशराव दुधगावकर व महसूल कर्मचाऱ्यांनी ही जमीन महसूल दफ्तरी बनावट व खोटे फेरफार नोंदवून माजी खा.गणेशराव दुधगावकर यांच्या नावे करुन दिली. यामध्ये मुख्य भूमिका तलाठी दत्तात्रय श्रीरंगराव कदम याने निभावली. २०१२ मध्ये एक बनावट फेरफार नोंदवून त्या अधारे सर्वे नं. ६१३ मधील १६ एक्कर ८ गुंठे जमीन गणेशराव दुधगावकर यांनी स्वत: खरेदी केली असल्याचे दाखवून त्याअधारे त्याचे मालक गणेशराव दुधगावकर हे असल्याची नोंद फेरफार रजिस्टरला घेण्यात आली.ज्ञानोपासक महाविद्यालयातील १३५ कर्मचाऱ्यांनी त्यांच्या स्वकष्टाने घरे बांधण्यासाठी खरेदी केलेली जमीन अॅड.गणेशराव दुधगावकर यांनी महसूल कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन हडप केली. त्यावरुन नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.