परभणी : महानुभव पंथ आणि वारकरी संप्रदायाला बांधणारा सेतू म्हणजे महाचिंतनी आहे. आपण वाचन संस्कृतीपासून दूर जात असून, ग्रंथ हे बुद्धीला खाद्य देणारे असतात. केवळ आस्तिकच नव्हे, तर नास्तिकालाही वाचनाची आवश्यकता आहे. तेव्हा वाचनाला मर्यादा न ठेवता वाचन संस्कृती जोपासावी, असे प्रतिपादन महानुभाव पंथाचे बा.भो. शास्त्री यांनी केले. येथील खानापूर परिसरातील श्रीकृष्ण दत्त मंदिरात आयोजित पुस्तक प्रकाशन प्रसंगी शास्त्री बोलत होते. परभणी येथे २०१९ मध्ये झालेल्या महाचिंतनीमधील सर्व विचारवंतांचे विचार शब्दबद्ध करून चिंतनीतले चिंतन या ग्रंथाची निर्मिती डॉ.गणेश मारेवाड यांनी केली आहे. या ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी बा.भो. शास्त्री बोलत होते. यावेळी कवी प्रा.इंद्रजीत भालेराव, वैद्यराज बाबा यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा.इंद्रजीत भालेराव म्हणाले, डॉ.गणेश मारेवाड यांनी परिश्रमाने पुस्तकाचे संपादन केले आहे. निष्ठेने आणि प्रेमाने केलेली पुस्तकाची मांडणी यातून सिद्ध झालेला हा ग्रंथ देखणा झाला आहे. महाचिंतनीतील चिंतन या पुस्तकातील विचार वाचकांसाठी प्रेरणादायक ठरतील, असे भालेराव म्हणाले. बाभुळगावकर बाबा यांनी प्रास्ताविक केले. प्रा.सखाराम कदम यांनी सूत्रसंचालन केले. विश्वनाथ बाबा कोठी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी राजू शिंदे, मुकुंद शिंदे, साहेबराव जाधव, प्रा.सुधाकर फाजगे, नारायण शिंदे आदींनी प्रयत्न केले.
वाचन संस्कृती जोपासण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 4:17 AM