याप्रकरणी कविता झोडपे यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांची मुलगी काजल नितीन धापसे यांना २४ एप्रिल २०१९ रोजी शासकीय रुग्णालयातील प्रसूती विभागात दाखल केले होते. यावेळी डॉक्टरांनी मुलीचे सिझर करावे लागेल, असे सांगितले. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सिझर झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास काजल धापसे यांना त्रास होऊ लागला. याची माहिती नातेवाइकांनी परिचारिका आणि डॉक्टरांना दिली. त्यानंतर काजल यांना इंजेक्शन देण्यात आले. मात्र, काहीच फरक पडला नाही. प्रकृती अधिकच खालावली. रात्रपाळीला असलेले डॉक्टर मुलीच्या आरोग्याची पाहणी करण्यासाठी आले नाहीत. २५ एप्रिल रोजी रात्री ३ वाजण्याच्या सुमारास त मुलीचा मृत्यू झाला. त्यामुळे डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे करण्यात आली. या तक्रारीवरून चौकशी समिती नियुक्त केली होती. डॉ. नरेंद्र वर्मा, डॉ. किशोर सुरवसे, डॉ.संदीप कला यांनी चौकशी केली. डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी योग्यरीत्या काम केले नाही. कामात निष्काळजीपणा केल्याचे अहवालात नमूद केले आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर कविता झोडपे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून डॉ. शेळके, अधिपरिचारिका अनुजा नरवाडे, डॉ. दुरशेवार गुलाम जिलानी (समरीन), डॉ.अरुणा राठोड यांच्याविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक मारुती चव्हाण या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
उपचारात निष्काळजीपणा; तीन डॉक्टरांसह परिचारिकेविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 4:14 AM