परभणी : येथील रेल्वेस्थानकावर वाढलेली प्रवासी संख्या लक्षात घेऊन स्थानकाचा विस्तार करीत नवीन इमारत बांधण्यात आली. मात्र या इमारतीचे अद्याप उद्घाटन झाले नसल्याने या ठिकाणी कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. परिणामी प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील परभणी हे मोठे रेल्वेस्थानक असून या स्थानकावरुन दररोज ४० रेल्वे गाड्या धावतात. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही हजारोंच्या घरात असल्याने परभणी रेल्वेस्थानकातून प्रशासनाला मोठे उत्पन्न मिळते; परंतु, त्या तुलनेत प्रवाशांना सुविधा मिळत नसल्याने ओरड होत आहे. परभणी रेल्वेस्थानकावर वरील सुविधांबरोबरच या मार्गावरुन वाढीव रेल्वेगाड्यांची मागणी येथील प्रवासी संघटना सातत्याने करीत आहेत. मात्र रेल्वे प्रशासन या मागण्यांकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.
परभणी रेल्वेस्थानक हे निजामकालीन स्थानक असून या स्थानकावरुन मुंबई, पुणे, दिल्ली, नांदेड, हैदराबाद, कोल्हापूर, तिरुपती येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मागील काही वर्षांपासून रेल्वेच्या प्रवाशांची संख्या एस.टी. महामंडळाच्या तुलनेत दुप्पटीने वाढली आहे. सद्यस्थितीत या रेल्वे स्थानकावर मुख्य प्रवेशद्वारासमोर दोन तिकीट खिडक्या, एक आरक्षण खिडकी, एक चौकशी खिडकी आणि व्हेंडर तिकीटांचे एक काऊंटर उपलब्ध आहे. प्रवासी संख्या मोठ्या संख्येने असल्याने रेल्वेगाडी स्थानकावर दाखल होताना तिकिटासाठी मोठी रांग लागते. वेळेत तिकीट मिळविण्यासाठी प्रवाशांची धावपळही होते. ही बाब लक्षात घेऊन या स्थानकाचा विस्तार करुन नव्याने इमारत बांधकाम करण्यात आले.
या इमारतीत तिकीट खिडकी बरोबरच आरक्षणाचीही खिडकी सुरु करणे प्रस्तावित आहे. वर्षभरापासून इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी उद्घाटन मात्र झाले नाही. परिणामी या नवीन इमारतीचा केवळ प्रवेशद्वार म्हणून वापर केला जात आहे. रेल्वे प्रशासनाने या इमारतीचे उद्घाटन करुन या ठिकाणी प्रवाशांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
सुविधा नसल्याने इमारतीचा निवाऱ्यासाठी वापरपरभणी रेल्वे स्थानकावरील नवीन इमारतीत सध्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. विशेष म्हणजे, रेल्वेचे कर्मचारीही या इमारतीत अनेक वेळा उपस्थित नसतात. ४परिणामी ओसाड पडलेल्या या इमारतीचा दुरुपयोग वाढत आहे. रेल्वेस्थानकावर बेवारस अवस्थेत थांबणाऱ्या व्यक्ती या नवीन इमारतीचा वामकुक्षीसाठी उपयोग करीत आहेत. ४दुपारच्या वेळी या ठिकाणी अनेकजण अस्ताव्यस्तपणे झोपलेले असतात. तसेच या इमारतीत तिकिटांची सुविधा नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
दोन वेळा रंगरंगोटीरेल्वेस्थानकावरील विस्तारित इमारत बांधून पूर्ण झाली असली तरी या इमारतीचा प्रवाशांसाठी प्रवेशद्वारा व्यतिरिक्त कोणताही लाभ होत नाही. रेल्वे प्रशासनाने इमारत बांधकामानंतर रंगरंगोटी केली होती. त्यानंतर मध्यंतरी संपूर्ण रेल्वेस्थानकाला रंगरंगोटी करण्यात आली. त्यात या इमारतीलाही रंगरंगोटी करण्यात आली आहे; परंतु, इमारतीत प्रवाशांना सुविधा मात्र दिल्या जात नसल्याने नवीन इमारत गैरसोयीची ठरत आहे.
व्हेंडर मशीन बंद अवस्थेतरेल्वे स्थानकावरील नवीन इमारतीत प्रवाशांना तात्काळ रेल्वेचे तिकीट मिळावे, यासाठी व्हेंडर मशीन बसविण्यात आली आहे; परंतु, या मशीनचा वापर होत नसल्याने ही मशीन असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे.सध्या या नवीन इमारतीमधून स्थानकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे; परंतु, नवीन इमारतीत तिकिटाची सुविधा तसेच रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकांची माहिती उपलब्ध नसल्याने प्रवाशांना हेलफाटा घालून जुन्या इमारतीत जावे लागते. ही गैरसोय दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने इमारतीचे उद्घाटन करुन प्रवाशांना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी होत आहे.