परभणी : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे बँडबाजा वाजत असताना गुरुवारी परभणी दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी परभणीच्या जागेबाबत ठोस भूमिका घेतली नाही. यावर पक्षश्रेष्ठीच अंतिम निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादी नाही तर मग परभणीची जागा लढणार कोण? असा प्रश्न या निमित्ताने पुढे आला. परभणी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी ते परभणीत आले असता पत्रकारांशी बोलत होते. परभणीच्या जागेवर तुमच्या पक्षाचा दावा असेल का? या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट शब्दात याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे विधान करून इच्छुकांसह पदाधिकाऱ्यांना संभ्रमात टाकल्याचे यावेळी दिसून आले.
महायुतीच्या माध्यमातून आगामी लाेकसभा निवडणुकीचा उमेदवार ठरणार आहे. त्यामुळे निश्चितच आम्ही परभणीत विजय मिळवू, यात काही शंका नाही. मात्र ही जागा कोण लढणार याबाबत अद्यापही निर्णय झाला नसल्याने सध्या आम्ही या ठिकाणी दावा करू शकत नाही. यार वरिष्ठ पातळीवर महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत निर्णय होणार आहे. यात आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडल्यानंतर त्यावर अंतिम निर्णय होईल. परंतु सध्या आम्ही परभणीसह राज्यातील किती जागा लढणार? यावर बोलणं सध्या संयुक्तिक नाही, असं म्हणत तटकरे यांनी परभणीच्या जागेबाबत संभ्रम निर्माण केला. मात्र आमची ताकद ज्या ठिकाणी आहे, तिथे आम्ही निश्चितच उमेदवारीवर दावा करत महायुतीच्या नेत्यांकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार विक्रम काळे, रूपाली चाकणकर, सूरज चव्हाण, प्रताप देशमुख, राजेश विटेकर, भावना नखाते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.