शहराचा विस्तार हळूहळू वाढत आहे. नवनवीन वसाहती निर्माण होत आहेत. मात्र या वसाहतींमध्ये मुलभूत नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मनपा पदाधिकारी, प्रशासन गांभीर्याने प्रयत्न करीत नाहीत. या भागातील नागरिकांकडून मालमत्ता कर वसूल केला जातो; परंतु, सुविधा देताना मात्र आखडता हात घेतल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
वसमत रस्त्यावरील सिद्धीविनायकनगर, आरोग्य कॉलनी, माऊलीनगर, मातोश्रीनगर आदी वसाहतींची प्रत्यक्ष पाहणी केली तेव्हा रस्ते आणि नाल्यांची समस्या प्रकर्षाने जाणवली. रस्ताच तयार केला नसल्याने तात्पुरत्या पायवाटवजा किंवा मुरुम टाकून बनविलेल्या रस्त्यांवरुन नागरिकांना वाहतूक करावी लागत आहे. नाल्या नसल्याने जागोजागी सांडपाणी साचले असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या वसाहती १५ ते २० वर्षापूर्वीच्या असून नागरिकांना अद्यापही मुलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या नाहीत. दोन महिन्यांपूर्वी नवीन पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी या भागात अंथरण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत जाणवत असलेला पाण्याचा प्रश्न तेवढा सुटला आहे. इतर समस्या मात्र कायमच आहेत.
रस्ते, नाली, पथदिव्यांचा प्रश्न कायम
वसमत रस्त्यावरील सिद्धीविनायक नगर, आरोग्य कॉलनी, माऊलीनगर यासह इतर वसाहतींमध्ये रस्ते आणि नाल्यांचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून कायम आहे. रस्ते नसल्याने पावसाळ्यात या भागातील नागरिकांना कसरत करावी लागते.
गुडघ्या इतक्या चिखलातून रस्ता काढावा लागतो. अनेक वेळा तर पावसामुळे वाहने घरापर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे वाहने मुख्य रस्त्यावरच सोडून पायीच घर गाठावे लागत आहे. घराच्या आजुबाजूलाच सांडपाण्याचे डबके आरोग्याच्या समस्यांचा निमंत्रण देत आहेत. याशिवाय पथदिव्यांचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही.