परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने पर जिल्ह्यातील व्यक्तींना जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली असून, यासाठीचे ई-पास देण्यात येऊ नयेत, असे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बुधवारी सकाळी काढले आहेत़
परभणी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४४८ झाली आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे़ कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या १५ दिवसांत झपाट्याने वाढत आहे़ त्यामुळे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बुधवारी सकाळी एक आदेश काढला आहे़ त्यात म्हटले आहे की, परभणी जिल्ह्यात सर्वसाधारण वास्तव्य नसणाऱ्या व्यक्तींना परवाने देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे़
त्यामुळे जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग पाहता शहरी व ग्रामीण भागातून परभणी जिल्ह्यात येण्यासाठी दैनंदिन किंवा इतर स्वरुपातील प्रवासाचे ई-परवाने आणि इतर परवानग्या २१ ते ३१ जुलै या कालावधीत देण्यात येऊ नयेत, केवळ वैद्यकीय कारणासाठी तातडीची खात्री झाल्यास व सदरील व्यक्ती जिल्ह्यातील रहिवाशी असल्यास (आधार पत्त्यानुसार) परवानगी देण्यास हरकत नाही़ माल वाहतूक, अत्यावश्यक सेवा व तातडीची वैद्यकीय सेवा असलेल्या व्यक्तींना व वाहनांना सूट राहील़ उर्वरित कोणत्याही व्यक्तीला किंवा वाहनधारकाला प्रवासी परवाने देण्यात येऊ नयेत, असे पत्र जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना पाठविण्यात आले आहे़ त्यामुळे पर जिल्ह्यातून परभणीत येणाऱ्यांचा प्रवेश बुधवारपासूनच बंद करण्यात आला आहे़