परभणी : दरवर्षी जिल्ह्यात १५ एचआयव्ही पीडित माता बालकांना जन्म देतात. मात्र गरोदरपणाच्या काळातच एआरटी उपचार सुरू झाल्याने मागील तीन वर्षांपासून एकाही बालकास एचआयव्ही संक्रमण झालेले नाही.
एचआयव्हीसारख्या महाभयंकर आजारावर औषधोपचाराच्या सुविधा आता वाढविण्यात आल्या असून, जिल्ह्याच्या ठिकाणीही सेकंड आणि थर्ड लाईन उपचाराची सुविधा परभणीत मोफत उपलब्ध केल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे. सातत्याने होणारे समुपदेशन आणि योग्य उपचारामुळे एचआयव्हीच्या नवीन रुग्णांचे प्रमाण घटले आहे. जिल्ह्यात एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या वर्षभरात ६६ हजार २२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २७४ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत. एचआयव्हीबाधितांची संख्या शून्य टक्क्यावर आणण्यासाठी सध्या जनजागरण, उपचार या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच २००२ मध्ये ४२ टक्क्यांवर एचआयव्ही बाधितांचा आलेख सद्यस्थितीत जिल्ह्यात मात्र ०.४२ टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. त्यामुळे जिल्हा एड्स नियंत्रण कार्यालयाचे प्रयत्न सफल होताना दिसत आहेत.
२० महिला आढळल्या एचआयव्हीबाधित
जिल्हा एड्स नियंत्रण कार्यालयाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या कालावधित ४२ हजार ६७७ महिलांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ९ महिला एचआयव्हीबाधित आढळल्या.
गरोदर मातांनी घाबरण्याचे कारण नाही
एएनसी तपासणीदरम्यान गर्भवती महिलेची एचआयव्हीची तपासणी पॉझिटिव्ह असल्यास घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण बाळाची जन्मापासूनच रुग्णालयात योग्य काळजी घेतली जात असल्याने बाळ एचआयव्हीमुक्त जीवन जगू शकते.
एचआयव्हीसारख्या आजारावर आता औषधोपचारांच्या सुविधा वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळेच २००२ मध्ये असलेले जिल्ह्याचे ४२.५ टक्क्यांवरील प्रमाण आता ०.४२ टक्क्यांवर आणले आहे. २०३० पर्यंत परभणी जिल्हा एड्समुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- देवेंद्र लोलदे, जिल्हा एड्स नियंत्रण अधिकारी, परभणी
वर्षनिहाय ॲक्टिव्ह रुग्ण
वर्ष रुग्णटक्केवारी
२०१३ ६०० २.८६ %
२०१४ ५३३ १.८१ %
२०१५ ५०७ १.५७ %
२०१६ ४२३ १.१७ %
२०१७ ३८२ १.१४ %
२०१८ ३३४ ०.९८%
२०१९ २८६ ०.७४%
२०२० २७४ ०.४२%