परभणी जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाचा संसर्ग चार महिन्यांनंतर घटल्याने १ जूनपासून एसटी महामंडळाची सेवा पूर्ववत सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली. त्यानंतर विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांनी अनेक वेळा वाहक व चालक तसेच प्रवाशांना मास्क, फिजिकल डिस्टन्स व सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन केले. मात्र मंगळवारी परभणी येथील बसस्थानकात केलेल्या पाहणीत बहुतांश चालक, वाहक व प्रवाशांच्या तोंडावर मास्क दिसून आला नाही. तसेच सकाळी १० वाजता परभणी- कुंभारी या बसने प्रवास केला. तेव्हा तासाभरात चालक व वाहकाने आपला मास्क हनुवटीवर ठेवूनच प्रवास पूर्ण केला. तसेच एका सीटवर दोन ते तीन प्रवासी दिसून आले. या प्रवाशांमध्ये ही कोठेच फिजिकल डिस्टन्सिंग असल्याचे दिसून आले नाही. हा सर्व प्रकार जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना व्हायरस वाढीस पूरक ठरतो की काय? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
टाकळी कुंभकर्ण
परभणी बसस्थानकातून निघालेल्या परभणी-कुंभारी या बसमध्ये सकाळी १० वाजता सहा प्रवासी बसले होते. हे सर्व प्रवासी टाकळी कुंभकर्ण या बसस्थानकावर उतरले. तसेच याच बसस्थानकावरून पुढे शहापूर, कुंभारीकडे जाण्यासाठी तीन प्रवासी चढले. मात्र यातील केवळ दोन प्रवाशांच्या तोंडावरच मास्क असल्याचे दिसून आले.
शहापूर
मंगळवारी सकाळी परभणी बसस्थानकातून १० वाजता निघालेली परभणी- कुंभारी बस शहापूर बसस्थानकावर १०:३० वाजता पोहचली. याठिकाणी तीन प्रवासी उतरले. त्यापैकी दोन प्रवाशांच्या हनुवटीवर मास्क दिसून आला, तर एक प्रवासी बिनधास्तपणे कुठलीही सतर्कता न बाळगता आपला प्रवास पूर्ण करताना दिसून आला.
आर्वी
परभणी कुंभारी ही बस १०:३५ मिनिटांनी आर्वी येथील बसस्थानकावर पोहोचली. या ठिकाणी सात प्रवासी उतरले तर एक प्रवासी बसमध्ये चढला. त्यापैकी केवळ पाच प्रवाशांच्या चेहऱ्यावर मास्क दिसून आला. मात्र प्रवाशांनी फिजिकल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.
कुंभारी बाजार
सकाळी १० वाजता परभणी बसस्थानकातून निघालेली ही बस चार गावांतील प्रवाशांना उतरून कुंभारी बाजार या बसस्थानकावर पोहोचली. या ठिकाणी १२ प्रवासी उतरले. यातील केवळ एका प्रवाशाच्या हनुवटीवर दिसून आला. विशेष म्हणजे बसमधील एका प्रवाशाने प्रवासादरम्यान सॅनिटायझर वापर केल्याचे दिसून आले नाही.
तासाभराच्या प्रवासात वीस मिनिटे तोंडावर मास्क
चालक
परभणी बसस्थानकावरून निघालेली परभणी-कुंभारी बस १० वाजून ४० मिनिटांनी कुंभारी येथील बसस्थानकावर पोहोचली. या ४० मिनिटांच्या प्रवासात चालकाच्या तोंडावर केवळ २० मिनिटे मास्क दिसून आला.
वाहक
चाळीस मिनिटांच्या प्रवासामध्ये वाहकाच्या हनुवटीवर पूर्ण प्रवास मास्क दिसून आला. विशेष म्हणजे या वाहकाजवळ कोणतेही सॅनिटायझर दिसून आले नाही.
प्रवासी
परभणी- कुंभारी या बसमध्ये एका सीटवर एका ठिकाणी तीन प्रवासी दिसून आले. या तीन प्रवाशांपैकी केवळ एका प्रवासाच्या हनुवटीवर मास्क दिसून आला. या तिन्ही प्रवाशांनी फिजिकल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे वाहकाने ही या प्रवाशांना हटकले नसल्याचे दिसून आले.