परभणी: महायुतीचा उमेदवार कोण असेल हे अजून स्पष्ट नाही. मात्र, उमेदवार कोणीही अन् कोणत्याही पक्षाचा असो, महायुती अभेद्य राहणार आहे. एकजुटीने काम करत विजयाचा निर्धार रविवारी पाथरी रस्त्यावरील रेणुका मंगल कार्यालयात आयोजित महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी महायुतीच्या नेत्यांनी केला.
भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने रविवारी महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास आमदार मेघना बोर्डीकर, आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, मोहन फड, डॉ. मधुसूदन केंद्रे, हरिभाऊ लहाने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, संतोष मुरकुटे, राजेश देशमुख, व्यंकटराव शिंदे, माधव गायकवाड, प्रताप देशमुख, सुरेश भुमरे, सुभाष कदम यांच्यासह नेते व पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये एकोप्याने लढण्यासाठी महायुतीच्या पक्षात समन्वय साधण्यासाठी रविवारी समन्वय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात उमेदवार कोणत्याही पक्षाचा व कोणीही असला तरी आपल्याला संगनमताने काम करून परभणी जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवाराला मोठा विजय मिळवून द्यायचा आहे. त्यामुळे आतापासूनच कामाला लागणे आवश्यक असल्याचे मत या नेत्यांनी मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांच्या समोर मांडले. यापुढेही राज्यस्तरावरील नेत्यांच्या उपस्थितीत परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी महायुतीचे मेळावे आयोजित करून कार्यकर्त्यांना एकत्र आणत आगामी लोकसभेत विजयाचे ध्येय गाठायचे असल्याचे नेत्यांनी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना सांगितले. या मेळाव्याला जिल्ह्यातील काेनाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
दहा गावांचा सुद्धा विकास नाही
संजय जाधव हे दहा वर्ष खासदार होते, मात्र त्यांनी दहा गावांचा सुद्धा विकास केला नाही. महायुतीचा उमेदवार कोण असेल हे अजून स्पष्ट नाही. मात्र, विद्यमान खासदार संजय जाधव यांना निवडणुकीत पराभूत करणे हे ध्येय असल्याचे माजी आमदार मोहन फड यांनी केले. माजी आमदार मोहन फड हे भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख आहेत.
अन् दुर्राणी यांचा भाजपचे जिल्हाध्यक्ष असा उल्लेख
माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांचा नामोल्लेख करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाऐवजी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष असा उल्लेख केला. यामुळे कार्यकर्त्यांमधून आठवण करून देताच डॉ. केंद्रे यांनी सारवासारव करताना सांगितले की, कालच भाजपच्या नेत्यांनी सांगितले की, काही दिवसातच मोठा राजकीय भूकंप होणार आहे. त्यामुळे कोण कुठे आहे, हे कळायला मार्ग नाही. त्यांच्या या मिश्किल टिप्पणीने व्यासपीठावरील नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही हसू आवरले नाही.
नेत्यांना तीळगूळ अन् कार्यकर्त्यांना भोजन
महायुतीच्या वतीने रविवारी आयोजित समन्वय मेळावा योगायोगाने मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला आला. त्यामुळे शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांना तीळगूळ देऊन तोंड गोड केले. मात्र, दुसरीकडे जिल्ह्यातील काेनाकोपऱ्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी कार्यक्रम स्थळाच्या बाजूलाच भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.