परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसकडून गळचेपी होत असल्याच्या कारणावरून शिवसेनेचे खा़ बंडू जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बुधवारी पदाचा राजीनामा दिला आहे़ त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे़.
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत यापूर्वी टोकाचा विरोध होता़ राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर दोन्ही पक्षातील नेत्यांनी जमवून घेतले होते़ असे असले तरी अंतर्गत नाराजीचा सूर गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे़ अशातच जिल्हा नियोजन समितीच्या निधीचे वितरण, विविध अशासकीय समित्यांवरील नियुक्ती आदींच्या कारणावरून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुही निर्माण झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे़ या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्ह्यात गळचेपी होत असल्याच्या कारणावरून बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिल्याचे सूत्रांनी सांगितले़
ही असू शकतात नाराजीची कारणेया राजीनाम्यासाठी बाजार समित्यांवरील प्रशासकांची नियुक्ती हेही एक कारण असल्याचे समजते़. जिंतूर बाजार समितीवर प्रशासक नियुक्त करण्यावरून वाद झाला होता. येथे राष्ट्रवादीचा प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. तसेच जिल्हास्तरावरील अशासकीय समित्यावर सदस्यांची नियुक्ती करण्यावरूनही खा़ जाधव यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते़ तसेच राष्ट्रवादीचा आमदार नसलेल्या मतदारसंघातही शिवसेनेला विचारात घेतले जात नसल्याचे त्यांचे म्हणणे असल्याचे समजते़