परभणी: शहर वाहतूक शाखेने मागील दोन वर्षात जप्त केलेल्या फटाका सायलेन्सरवर शनिवारी दुपारी पोलीस मुख्यालय येथील शहर वाहतूक शाखेच्या प्रांगणात बुलडोझर फिरविला आहे. यामध्ये एकूण ४४५ सायलेन्सर ज्याची एकूण किंमत १३ लाख ३५ हजार एवढी आहे. या सायलेन्सरला बुलडोझर फिरवून नष्ट करण्यात आले आहे.
शहर वाहतूक शाखेच्या पोलीस मुख्यालयातील प्रांगणामध्ये शनिवारी दुपारी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोडे, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड, पोलीस उपनिरीक्षक मकसूद पठाण, रवींद्रनाथ दीपक यांच्यासह १० ते १५ कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली. दोन वर्षात शहरात विविध ठिकाणी कारवाई करून जप्त केलेले साडेचारशे सायलेन्सर शहर वाहतूक शाखेच्या पोलीस मुख्यालयातील एका खोलीत जमा करण्यात आले होते. एका सायलेन्सरची किंमत अंदाजे तीन हजार एवढी होती. पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांच्या आदेशान्वये प्राप्त सूचनेनुसार ही मोहीम राबविण्यात आली.
शहरातील वेगवेगळ्या भागात राबविलेल्या मोहिमेमध्ये बुलेट वाहनाला तसेच अन्य वाहनांना जोडलेले फटाका सायलेन्सर हे जप्त करून संबंधित वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. यात ४४५ सायलेन्सर होते. त्यांची किंमत अंदाजे १३ लाख ३५ हजार एवढी आहे. शहर वाहतूक शाखेने मागील दोन वर्षात जप्त केलेल्या ४४५ फटाका सायलेन्सरवर शनिवारी दुपारी पोलीस मुख्यालय येथील शहर वाहतूक शाखेच्या प्रांगणात बुलडोझर फिरविला आहे. या कारवाईने वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
वाहनधारकांनी नियम पाळावे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. वाहनधारकांनी कागदपत्र बाळगून फटाका सायलेन्सर लावू नयेत. पोलीस दलाकडून जनजागृती आणि नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे.- सचिन इंगेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा