बाजार समितीचे संचालक मंडळ कारभारात अनियमितता झाल्याने १९ जानेवारी रोजी उपजिल्हा निबंधक मंगेश सुरवसे यांनी चौकशी अंती हे मंडळ बरखास्त केले होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने येथील बाजार समितीवर राष्ट्रवादी कांग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे यांनी अशासकिय प्रशासक मंडळ नियुक्तीसाठी जोरदार हालचाली चालू केल्या होत्या. तसेच बाजार समितीच्या कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण करत तक्रार केली होती. अखेर बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात भांबळे यांनी यश मिळविले. बुधवारी मुख्य प्रशासकपदी भांबळे यांचे विश्वासू कार्यकर्ते विनायक पावडे यांची वर्णी लागल्याची चर्चा होती. तसेच या अशासकिय प्रशासक मंडळात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माऊली ताठे, नबाजी खेडकर, अप्पासाहेब रोडगे, पवन कटारे, पवन आडळकर, दत्तराव आंधळे यांची नावे असल्याचे विश्वासू सूत्रानी सांगितले.
शिवसेनेला ठेंगा
बाजार समितीवर अप्रशासकीय मंडळ स्थापन करण्यासाठी दोन महिन्यापासून माजी आमदार विजय भांबळे हे प्रयत्नशिल होते. तसेच सेनेचे खासदार संजय जाधव यांनी देखील आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना अशासकीय प्रशासक मंडळावर नियुक्तीसाठी प्रयत्न चालविले होते. मात्र भांबळे यांनी काँग्रसचे दोन सदस्य घेवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. यामुळे शिवसेनेला मोठी चपराक बसल्याची चर्चा आहे. दरम्यान बूधवारी उशिरापर्यंत अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्तीचे पत्र संबधीत विभागाकडे प्राप्त झाले नसल्याची माहिती सहाय्यक निबंधक माधव यादव यांनी दिली.