जिंतूर : वीज वितरण कंपनीतील २१ अभियंत्यांना थकबाकीच्या कारणास्तव १९ मार्च रोजी अधीक्षक अभियंता यशवंत कांबळे यांनी कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या आहेत़ त्यामुळे अभियंत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे़
जिल्ह्यातील १० उपविभागांतर्गत महावितरणच्या वतीने जवळपास २ लाख ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो़ यामध्ये औद्योगिक, घरगुती, लघुदाब व कृषीपंप धारकांचा समावेश आहे़ या ग्राहकांना महिन्याकाठी महावितरणच्या वतीने वीज बिल दिले जाते़ परंतु, बहुतांश ग्राहकांनी महावितरणचे वीज बिल वेळेत न भरल्याने जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात थकबाकी झाली आहे़ सध्या मार्च एंडींग चालू असल्याने महावितरण कंपनीने १ मार्चपासून शून्य थकबाकी विशेष मोहीम सुरू केली आहे़ या मोहिमेंतर्गत दर दिवशी अनेक थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करून ज्या ग्राहकांकडे थकबाकी आहे, त्या ग्राहकांची वसुली सुरू आहे़ परंतु, ज्या उपविभागात समाधानकारक थकबाकी वसुली झाली नाही़ त्या उपविभागातील २१ अभियंत्यांना अधीक्षक अभियंता कांबळे यांनी १९ मार्च रोजी थकबाकी वसुलीच्या कारणास्तव कारणे दाखवा नोटीस बजावली आहे़ त्यामुळे अभियंत्यांमध्ये खळबळ उडाली आहे़
दरम्यान, गतवर्षीपेक्षा यावर्षी समाधानकारक वसुली झाली आहे़ त्यामुळे अधीक्षक अभियंत्यांनी पाठविलेल्या कारणे दाखवा नोटिसांचा पुनर्विचार करून या नोटीस मागे घेण्यात याव्यात, अशी मागणी एस़ई़ ए़ संघटनेच्या वतीने नांदेड परिमंडळातील मुख्य अभियंता यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे़ निवेदनावर एसईए संघटनेचे सहसचिव नितीन थिटे यांची स्वाक्षरी आहे.
‘एस.ई.ए.’कडून आत्मक्लेश आंदोलनमार्च २०१८ मध्ये विक्रमी वसुली व्हावी, या उद्देशाने सर्व अभियंते व कर्मचार्यांनी प्रयत्न केले. गतवर्षीपेक्षा यावर्षी सर्वाधिक वसुलीही केली आहे़ परंतु, परभणी मंडळ कार्यालयांतर्गत कार्यरत जवळपास २१ अभियंत्यांना महावितरणचे अधीक्षक अभियंता कांबळे यांनी थकबाकीच्या कारणास्तव कारणे दाखवा नोटीसा दिल्या. या नोटिसा परत न घेतल्यास २६ मार्च रोजी महावितरण कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे. तसेच सलग ७२ तास आपापल्या कार्यालयात कार्यरत राहून आत्मक्लेश आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती एसईए संघटनेचे सहसचिव नितीन थिटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
समाधानकारक काम न केलेल्यांना नोटीसा महावितरण कंपनीच्या वतीने शून्य थकबाकी वसुली मोहीम राबविण्यात येत आहे़ यामध्ये अनेक ग्राहकांची थकबाकी वसुली झाली आहे़ परंतु, ज्या अभियंत्यांनी आपल्या कार्यक्षेत्रांतर्गत समाधानकारक काम केले नाही़, त्या अभियंत्यांना कार्यालयाकडून कारणे दाखवा नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत़ त्यामुळे कोणाचे खच्चीकरण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही़- यशवंत कांबळे, अधीक्षक अभियंता, परभणी