कोरोनाकाळापासून अनेक जण वैयक्तिक वाहनाने किंवा खासगी वाहन भाड्याने घेऊन प्रवासाला जाण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे या कालावधीत अनेकांनी याकडे व्यवसाय म्हणून पाहिले. ही बाब लक्षात घेत अनेकांनी नवीन कार तसेच अन्य वाहनांची खरेदी केली. ही वाहने भाडेतत्त्वावर देत त्यातून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परभणी शहरात वसमत रोडवरील आरआर पेट्रोल पंप तसेच उड्डाणपूल परिसरात खासगी प्रवासी वाहनांचे वाहनतळ आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कार, स्कॉर्पिओ, जीप, क्रुझर यासारख्या वाहनांची उपलब्धता आहे. ही सर्व वाहने भाडेतत्त्वावर दिली जातात. जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यांतील प्रवासासाठी अनेकजण या वाहनांचा वापर करतात. मागील एक वर्षापासून सतत लाॅकडाऊन आणि वाढणारे पेट्रोल, डिझेलचे दर यामुळे या वाहनमालकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात दररोज वाढणाऱ्या पेट्रोलच्या व डिझेलच्या दरामुळे किलो मीटरप्रमाणे दिल्या जाणाऱ्या वाहनाच्या दरावरही परिणाम झाला आहे. मागील वर्षभरात खासगी प्रवासी वाहनांची दरवाढ १० टक्के झाल्याचे वाहनचालकांनी सांगितले.
असे वाढले पेट्रोल डिझेलचे दर (प्रतिलिटर)
फेब्रुवारी २०२१
पेट्रोल - ९९.७८ डिझेल ८९.२५
ऑगस्ट २०२१
पेट्रोल ११०.१६ डिझेल ९८.६०
प्रवासी वाहनांचे दर
कार १० रुपये
स्कॉर्पिओ १३ रुपये
क्रुझर १४ रुपये
८ सीटर वाहन १५ रुपये
गाडीचा हप्ता कसा भरणार ?
जिल्ह्यात खासगी प्रवासी वाहनांची संख्या वाढली आहे. त्यात दररोज भाडे मिळेल याची शक्यता कमीच असते. काही दिवस जिल्ह्यातीलच भाडे मिळते मात्र त्यातून चालकाचा खर्च, इंधनाचा खर्च आणि वाहनांची दुरुस्ती हे करून फारसे पैसे उरत नाहीत.
- उपेंद्र विडोळकर वाहनमालक.
पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने ग्राहक वाहन ठरविताना सांगितलेले दर ऐकून घासाघीस करतात. यात वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे व स्पर्धेमुळे मिळेल त्या दरामध्ये वाहन भाडेतत्त्वावर देण्याची वेळ येत आहे. त्यातून खर्च निघणेही कठीण झाले आहे.
- पंढरीनाथ तरवटे.
एसीसाठी १ रुपया अतिरिक्त
कार भाडेतत्त्वावर नेताना साधारण १० रुपये किलोमीटर हा सध्या दर आहे. त्यात एसी कार हवी असल्यास ११ रुपये लागतात. प्रत्येक वाहन प्रकारात १ रुपया प्रतिकिलोमीटर एसीचा दर जास्त असतो तर दिवसभराचे आताचे पेट्रोल-डिझेल टाकून नेण्याचे दर १ हजार ठरलेले भाडे आणि त्यानंतर १० रुपये प्रति किलोमीटरप्रमाणे पेट्रोल टाकले जाते.