लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मागच्या आठवड्यात कमी झालेली कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा वाढली असून, जिल्ह्यात आता १२३ रुग्ण उपचार घेत आहेत. गुरुवारी १४ नवीन रुग्णांची भर पडली आहे.
मागील आठवड्यात रुग्णांची संख्या घटल्याने जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १००पेक्षा कमी झाली होती. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र, हळूहळू ही संख्या पुन्हा वाढू लागली आहे. १४ जानेवारी रोजी ८२२ नागरिकांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. त्यामध्ये आरटीपीसीआरच्या ७८८ अहवालात ३ अहवाल पॉझिटिव्ह आहेत तर रॅपिड टेस्टच्या ३४ अहवालात ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. येथील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे तर चार रुग्णांना कोणतीही लक्षणे नसल्याने कोरोनामुक्त जाहीर करण्यात आले आहे. जिल्ह्यात आता एकूण ७ हजार ७७९ रुग्ण झाले असून, त्यातील ७ हजार ३४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ३०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १२३ रुग्ण उपचार घेत आहेत.
गुरुवारी दिवसभरात परभणी शहरातील कृषीसारथी कॉलनी येथील ४२ वर्षीय पुरुष, ५० वर्षांची महिला, ६६ वर्षांचा पुरुष, रहिमनगर भागातील २८ वर्षीय तरुण, नवा मोंढा भागातील ५० वर्षीय महिला, रामकृष्ण नगरातील ७५ वर्षीय पुरुष, ६३ वर्षीय महिला, १४ वर्षांचा युवक, ७२ वर्षांचा वृद्ध, माधवनगर येथील ३४ वर्षीय पुरुष, रायगड कॉर्नर भागातील ४३ वर्षीय पुरुष, सोनपेठ शहरातील ४६ वर्षीय पुरुष, २५ वर्षीय तरुण, जिंतूर तालुक्यातील भोगाव येथील ५० वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.