परभणी जंक्शन येथून सध्या २० ते २४ रेल्वे ये-जा करतात. राज्यातील मुंबई, नागपूर, पुणे, कोल्हापूर यासह मनमाड व परराज्यात जाणाऱ्या रेल्वेची सध्या ये-जा सुरू आहे. मात्र, या सर्व रेल्वे आरक्षित असल्याने त्यांना जिल्ह्यातील काही तालुक्यांना थांबे नाहीत. छोट्या स्थानकांवर थांबणाऱ्या पॅसेंजरची सध्याची संख्या केवळ तीनच आहे. यातच जुन्या दोन पॅसेंजर विशेष रेल्वेत परिवर्तित केल्याने त्यांचेही ग्रामीण स्थानकाचे थांबे रद्द करण्यात आले आहेत. यामुळे तालुका व जिल्ह्याचे ठिकाण गाठण्यासाठी अजूनही प्रवाशांना रेल्वेचा पर्याय अवलंबता येत नसल्याचे दिसून येते.
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
हैदराबाद-औरंगाबाद विशेष एक्सप्रेस
परभणी-नांदेड-तांडूर
धर्माबाद-मनमाड
नांदेड-मुंबई (तपोवन)
नांदेड-पुणे (साप्ताहिक)
नांदेड-अमृतसर (सचखंड)
नांदेड-पनवेल
नांदेड-बेंगलोर
या ठिकाणी रेल्वे कधी थांबणार
परभणी जिल्ह्यातील पूर्णा मार्गावरील पिंगळी, मिरखेल, चुडावा, सेलू मार्गावरील पेडगाव, देवलगाव अवचार, ढिंगळी पिंपळगाव व गंगाखेड मार्गावरील पोखर्णी, सिंगणापूर, धोंडी या स्थानकांवर सध्या केवळ एकच रेल्वे दिवसभरात ये-जा करते. यापूर्वी या स्थानकांवर दिवसभरात सात ते आठ पॅसेंजर रेल्वे ये-जा करीत होत्या. सध्या नांदेड विभागात तीनच पॅसेंजर सुरू आहेत. ही संख्या खूप कमी झाली आहे.
विशेष रेल्वेला दिलेले थांबे पूर्वीप्रमाणेच आहेत. केवळ औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजर विशेष एक्सप्रेसमध्ये परिवर्तित केल्याने ही रेल्वे छोट्या स्थानकावर सध्या थांबत नाही. उर्वरित रेल्वेचे थांबे जसेच्या तसे आहेत.
- अरविंद इंगोले, स्टेशन प्रबंधक, परभणी.
थांबा नसल्याने आम्हाला होतो त्रास
परभणी जिल्ह्याचे ठिकाण असल्याने दररोज भाजीपाला तसेच अन्य साहित्य घेऊन विक्रीसाठी यावे लागते. मात्र, सध्या पिंगळी येथे रेल्वे थांबत नसल्याने या भागातील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. दिवसभरात या मार्गावर दोन पॅसेंजर धावत आहेत. ही संख्या वाढवावी.
- संदीप थोरात.
मानवत, गंगाखेड व पूर्णा तालुक्यातील छोट्या गावांना रेल्वे थांबत नसल्याने गैरसोय होत आहे. रेल्वेमध्ये तसेच तालुक्याच्या ठिकाणी खाद्यपदार्थ विक्री करण्यासाठी ये-जा करण्यास रेल्वे नसल्याने गैरसोय निर्माण होत आहे.
- रवि वाघमारे.