परभणी : अंगणवाडीमधील लाभार्थ्यांची माहिती एका क्लिकवर मिळावी, यासाठी अंगणवाडी सेविकांना ॲड्रॉईड मोबाईलचे वाटप करण्यात आले. मात्र, महिनाभरापासून कॅश प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने १२ रजिस्टरची माहिती मिळण्यास अडथळा निर्माण झाला आहे.
महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडी सेविकांकडे असलेल्या १२ रजिस्टरमधील लाभार्थ्यांची माहिती एका क्लिकवर मिळावी, यासाठी जिल्ह्यातील १ हजार ८३४ शहरी व ग्रामीण भागातील अंगणवाड्यांमधील १ हजार ७०० अंगणवाडी सेविकांना १,७०० मोबाईलचे वाटप केले. या मोबाईलच्या माध्यमातून ‘कॅश कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर’मधील अंगणवाडीतील लाभार्थ्यांची माहिती भरावयाची आहे. ही माहिती अंगणवाडी ताईसह महिला व बालविकास कार्यालयातील प्रत्येकाला उपलब्ध व्हावी, यासाठीही ही प्रणाली उपयुक्त होती. मात्र, गेल्या महिनाभरापासून या प्रणालीच्या सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाला आहे, तो अद्यापही दुरुस्त झालेला नाही. त्यामुळे १ हजार ७०० अंगणवाडीताईंना पुन्हा एकदा १२ रजिस्टरमध्ये लाभार्थ्यांची माहिती भरावी लागत आहे.
अडचणी काय !
अंगणवाडीताईंना पूर्वी लाभार्थ्यांची माहिती १२ रजिस्टरमध्ये नोंद करावी लागत होती. त्यानंतर कॅश प्रणाली अंमलात आणली. परंतु, महिनाभरापासून यामध्ये बिघाड झाल्याने पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच १२ रजिस्टरमध्ये नोंदी घ्याव्या लागत आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
लाभार्थ्यांच्या आहाराच्या ठेवाव्या लागतात नोंदी
केंद्र शासनाच्या माध्यमातून महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्ह्यात १,८३४ अंगणवाड्यांमध्ये लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची नोंद या कॅश प्रणालीमध्ये ठेवावी लागते.
यामध्ये आहार वाटप, कुटुंब नोंदणी, लाभार्थ्यांचे हजेरी पट, कुपोषित बालकांची माहिती, गरोदर, स्तनदा मातांची माहिती, लाभार्थ्यांची सद्यस्थितीबाबत माहिती या कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये ठेवावी लागते.
अंगणवाडी सेविकांना १२ रजिस्टरमध्ये या लाभार्थ्यांची माहिती नोंद करावी लागत होती. त्यातून सुटका होऊन केवळ कॅश प्रणालीमध्ये लाभार्थ्यांची माहिती नोंद करावी लागते.
मात्र, महिनाभरापासून या सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्याने जिल्ह्यातील १ हजार ७०० अंगणवाडीताईंना पुन्हा एकदा लाभार्थ्यांच्या नोंदी या बारा रजिस्टरमध्ये घ्याव्या लागत आहेत.
महिला व बालविकास विभागाने कॅश प्रणालीसाठी अंगणवाडी सेविकांना दिलेल्या मोबाईलमुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील अंगणवाडीची माहिती एका क्लिकवर मिळत आहे. त्यामुळे या प्रणालीचा फायदा होत आहे.