कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी मास्कचा वापर आणि फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना प्रशासनाने नागरिकांना दिल्या आहेत. जिल्ह्यात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले असून, नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यासाठीही विविध भागात केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता तेथे फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. शहरातील जायकवाडी परिसरातील महानगरपालिकेच्या रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू आहे. हे ज्येष्ठ नागरिक लस घेण्यासाठी एकाच ठिकाणी रांग लावून बसून असल्याचे दिसून आले. फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन होत असताना, मनपाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात कोणत्याही सूचना दिल्या नाहीत. अशीच परिस्थिती आरटीपीसीआर तपासणी करण्यासाठी आलेल्या नागरिकांचीही दिसून आली. या केंद्रांवरही फिजिकल डिस्टन्सचे पालन न करता रांग लागली होती. त्यामुळे एकीकडे फिजिकल डिस्टन्स, मास्क वापरण्याचे आवाहन प्रशासन करीत असताना, दुसरीकडे शासकीय संस्थांमध्येच या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले.
लसीकरणाच्या रांगेत फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 4:17 AM