गंगाखेड (जि. परभणी) : विवाहितेच्या छळ प्रकरणात सासरच्या मंडळीसह पतीच्या प्रेयसीविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेला माहेराहून १ लाख रुपये आणण्याची मागणी केली जात होती.
शहरातील रंगार गल्ली येथील पद्माकर अंबुरे यांच्या ज्योती नामक मुलीचा विवाह २४ फेब्रुवारी २०१८ रोजी लातूर येथील आकाश रविंद्र शहरकर याच्या सोबत झाला होता. लग्नाच्या महिनाभरानंतर विवाहित ज्योतीला तिच्या पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे कळाले. ही बाब विवाहितेने आपले सासरे रविंद्र शहरकर यांना सांगितले. मात्र सासऱ्यासह सासरच्या मंडळीने याकडे दुर्लक्ष केले. विवाहितेला माहेरहून १ लाख रुपये आणण्याची मागणी केली. तुझे वजन जास्त आहे, स्वयंपाक येत नाही, आदी कारणावरुन पती आकाश शहरकरसह सासरा, नणंद स्वाती काळेगोरे, अभिनंदन काळेगोरे आदींनी विवाहिता ज्योतीला शारीरिक त्रास देत तिला १९ सप्टेंबर २०१८ रोजी घराबाहेर हाकलून दिले. या प्रकरणी विवाहिता ज्योती शहरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गंगाखेड पोलीस ठाण्यात पती आकाश, त्याची प्रेयसी, सासरा रवींद्र शहरकर आदी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.