परभणी- मानवत रोड रस्त्याचे काम संथ
परभणी : परभणी ते मानवत रोड या रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून, या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. कल्याण ते निर्मल या राष्ट्रीय महामार्ग ६१ कल्याणहून मानवत रोडपर्यंत काम पूर्ण झाले आहे. मात्र, मानवत रोडपासून परभणी ते झिरो फाटा दरम्यानच्या रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रेंगाळले आहे.
दुधनेच्या पाण्याने शेतकऱ्यांत समाधान
परभणी : रब्बी हंगामातील पिकांसाठी निम्न दुधना प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यातून तिसरी पाणी फेरी देण्यात येत आहे. त्यामुळे सेलू, मानवत, जिंतूर, परभणी या चार तालुक्यातील जवळपास १३ हजार हेक्टरवरील पिकांना सिंचनासाठी हे पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या या पाण्याने शेतकऱ्यात समाधान दिसून येत आहे.
घरकुलांची बांधकामे अर्धवट
परभणी : शहरातील रमाई आवास आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या घरांचे बांधकाम रखडले आहे. काही लाभार्थ्यांना वाळूची समस्या निर्माण झाली आहे, तर काही जणांना वेळेत हप्ता मिळाला नसल्याने बांधकाम बंद ठेवावे लागत आहे. प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे लाभार्थी अडचणीत आले आहेत.
वळण रस्त्यावर वाढले अपघात
बनवस : पालम तालुक्यातील बनवस येथील वळण रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राज्य महामार्ग क्रमांक २३५ बनवस येथून जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येथे वळण रस्ते तयार करण्यात आले आहेत. हे वळण रस्ते तयार करीत असताना नियमांचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.