परभणी : रविवारी झालेल्या पावसाने शहरातील प्रभाग क्रमांक तीनमधील विश्वासनगर, वांगीनगर, करीमनगर, साईबाबानगर व संविधान चौक या परिसरातील १५० घरांमध्ये पाणी शिरले होते. यामुळे अनेक कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य पाण्याने भिजले.
शहरातील प्रभाग क्रमांक ३ परिसरात असलेल्या कॅनॉलजवळील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. यामध्ये घरात साठविलेले अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू, आवश्यक कागदपत्रे यांचे नुकसान झाले. तसेच काही घरांसमोर बांधलेल्या शेळ्या व कोंबड्या या पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेल्या. प्रभाग ३ मधील विश्वासनगर, वांगी रोड तसेच करीमनगर, साईबाबानगर, संविधान चौक या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना या पावसाच्या पाण्याचा फटका सहन करावा लागला. याबाबत नागरिकांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे निवेदन सादर केले.
आपत्ती व्यवस्थापनाच्या निधीतून या प्रभागातील नागरिकांना तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच या परिसरातील मोठ्या नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण करावे, अशी मागणी मिलिंद घागरमाळे, रेखा ओवळ, रुबीना बेगम, फकिरा जाधव, रेखा साठे, सुशीलाबाई ताकतोडे, छाया शेळके, सुमनबाई गालफाडे, मीना ताकतोडे, अनिता थोरात, अंजना खिल्लारे, शालू जंगले, रेखा कांबळे, निर्मलाबाई इंगोले, लक्ष्मीबाई जोगदंड यांच्यासह १०० नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.