वांगी येथील प्रकाश जगनाथराव चौधरी हे ऊसतोड मुकादम म्हणून काम करतात. त्यांच्या मुलीचे लग्न असल्याने त्यांनी पाथरी तालुक्यातील मसला येथील एका व्यक्तीकडून १ लाख हातऊसणे घेतले होते. ती रक्कम व जवळचे ४० हजार रुपये तसेच सात ग्रॅम सोन्याची अंगठी हे साहित्य घरातील कपाटात ठेवले होते. २५ एप्रिलच्या रात्री ते कुटुंबीयांसह घरात झोपले होते. मध्यरात्री त्यांची पत्नी उठली असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यामुळे त्यांनी पतीला झोपेतून उठवले. त्यानंतर त्यांना कपाटाचा दरवाजा उघडा दिसला. कपाटातील २ लोखंडी पेट्या दिसल्या नाहीत. त्यात त्यांनी पैसे व दागिने ठेवले होते. त्यांनी घराबाहेर जाऊन पाहिले असता त्यांना दोन्ही पेट्या पडलेल्या दिसल्या. मात्र, त्यातील रोख रक्कम व सोन्याची अंगठी गायब होती. त्यांनी याबाबत मानवत पोलीस ठाण्यात मंगळवारी फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले दीड लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 4:13 AM