परभणी : शहराबरोबरच आता ग्रामीण भागातील कोरोनाचा विळखा कमी झाला आहे. त्यामुळे ६५७ गावांमधील कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून, या गावांची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत आहे. सद्यस्थितीला केवळ ६२ गावांमध्ये रुग्ण उपचार घेत आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागही भरडला गेला होता. जिल्ह्यात एकूण ८०४ गावे असून त्यापैकी सुमारे ७१९ गावांमध्ये बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मे महिन्यात शहरी भागातील रुग्णसंख्येच्या तुलनेत ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वाढली होती. त्यामुळे जिल्ह्यातच चिंतेचे वातावरण होते. मात्र जून महिन्यापासून कोरोना संसर्ग कमी झाला आहे. नवीन बाधित रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या घटली असून, नागरिकांना दिलासा मिळत आहे.
शहरी भागाबरोबरच आता ग्रामीण भागातही बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. सद्यस्थितीला ग्रामीण भागात केवळ ७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण ७१९ गावांमध्ये कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यापैकी सध्या ६५ गावांमध्येच बाधित रुग्ण उपचार घेत असून, उर्वरित गावे कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही व्यवहार आता पूर्वपदावर आले आहेत. सध्या ६२ गावांमध्ये बाधित रुग्णांची नोंद झाली असून, त्यात जिंतूर तालुक्यात सर्वाधिक १७ गावांमध्ये रुग्ण आहेत. त्याखालोखाल गंगाखेड तालुक्यातील १२, सेलू तालुक्यातील तीन गावांमध्ये रुग्ण नोंद झाले आहेत. परभणी आणि पाथरी तालुक्यांमध्ये प्रत्येकी पाच गावांतून कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. एकंदर ग्रामीण भागातील कोरोनाबाधित गावांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने हा संसर्ग कमी होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
३१ गावांमध्ये शंभरपेक्षा अधिक रुग्णांची नोंद
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये कोरोना पोहोचला होता. विशेष म्हणजे, काही गावांमध्ये शंभरपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात अशी ३१ गावे आहेत. परभणी तालुक्यात सर्वाधिक १३, पूर्णा ३, गंगाखेड २, मानवत ३ आणि सेलू तालुक्यातील एका गावात १०० पेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे ५१ ते १०० रुग्णांची नोंद झालेली ७१ गावे असून २५ पेक्षा अधिक रुग्णसंख्या नोंद झालेल्या १४९ गावांचा समावेश आहे.
११० गावांमध्ये पोहोचला नाही कोरोना
जिल्ह्यात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागही कोरोनाबाधित होत असतानाच, ११० गावे मात्र कोरोनापासून दूर राहिली आहेत. विशेष म्हणजे, गंगाखेड तालुक्यातील सर्वाधिक २९ गावांमध्ये अद्यापही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही, तर जिंतूर आणि पालम तालुक्यातील प्रत्येकी २१ गावांमध्ये कोरोनाचा रुग्ण नोंद झाला नाही. त्यामुळे या गावांचा आदर्श इतर गावांनी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.