मागील वर्षभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाची सेवा कधी बंद तर कधी सुरू होत असल्याने राष्ट्रीय परिवहन महामार्गाच्या परभणी जिल्ह्यातील एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. मागील काही दिवसांपासून एसटी महामंडळामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन करताना प्रशासनाची हतबलता दिसून आली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जिल्ह्यात १ जूनपासून एसटी महामंडळाच्या सेवेला सुरुवात झाली. नागरिक कोरोनाची मनातील भीती दूर करत बससेवेला प्रतिसाद देऊ लागले. परिणामी, एसटी महामंडळाच्या उत्पादनातही चांगली भर पडत होती. मात्र २७ दिवसांतच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संदर्भ देत जिल्हा प्रशासनाने २८ जून ते ४ जुलै या कालावधीत जिल्ह्यातील सर्व बससेवा बंद करण्याचे आदेश काढले. त्यामुळे नाइलाजाने विभागीय नियंत्रक कार्यालयाकडून जिल्ह्यातील बससेवा बंद करण्यात आली. मात्र, दुसरीकडे जिल्ह्यातील अवैध वाहतूक मागील चार दिवसांपासून सुसाट वेगाने रस्त्यावरून धावताना दिसत आहे. दुपटीचे भाडे देऊन जीव धोक्यात घालत प्रवाशांना प्रवास पूर्ण करावा लागत आहे. तसेच मराठवाड्यातील परभणी जिल्हा सोडला तर एकाही जिल्ह्यातील बससेवा बंद झाली नाही. त्यामुळे परभणी जिल्ह्यातीलच बससेवा बंद का, असा सवाल करत नागरिक प्रशासनाच्या या निर्णयाच्या विरुद्ध तीव्र संताप व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील पाथरी, गंगाखेड, परभणी व जिंतूर या चार आगाराला प्रत्येक दिवशी सद्यस्थितीला २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. मात्र, २८ जूनपासून बससेवा बंद पडल्याने पाच दिवसांत एसटी महामंडळाचे चार आगाराला एक कोटी रुपयांचा फटका बसला आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने सकारात्मक विचार करून बससेवेला परवानगी द्यावी, अशी मागणी प्रवाशी व महामंडळ प्रशासनाकडून होत आहे.
हिंगोलीत सुरू तर परभणीत बंद
परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यांचा एसटी महामंडळ कारभार पाहते. विशेष म्हणजे एक जूनपासून ते आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यात एसटी महामंडळाची सेवा सुरू आहे. मात्र, २८ जूनपासून जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानुसार ४ जुलैपर्यंत एसटी महामंडळाची सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाऱ्या दोन जिल्ह्यांपैकी हिंगोलीत सुरू तर परभणीत एसटी महामंडळाची सेवा बंद असल्याने संताप व्यक्त होत आहे.