जिंतूर : गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीतील डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने एकाचा मृत्यू झाल्याची घटनामंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशनसमोर घडली. संदीप विश्वनाथ कदम ( 37, बोर्डी) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, डीजेच्या दणदणाटाने आणखी तिघे अत्यवस्थ असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
शहरामध्ये गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये शहरातील पाच गणेश मंडळांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी तीन गणेश मंडळांनी मिरवणुकीत डीजे लावला होता. मिरवणूक पोलीस स्टेशनसमोर आली असताना डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे संदीप विश्वनाथ कदम अत्यवस्थ वाटू लागले. यामुळे सोबत असलेल्यांनी संदीप यास तत्काळ रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मावळली.
दरम्यान, यावेळी संदीप यांच्या सोबतचे शिवाजी कदम, शुभम कदम, गोविंद रामेश्वर कदम यांनाही डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे त्रास जाणवत होता. त्यांना तातडीने शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक उपचारांसाठी सर्वांना परभणी येथे हलवण्यात आले आहे.
या घटनेनंतर मिरवणूक त्याच ठिकाणी विसर्जित करण्यात आली. शासकीय रुग्णालयामध्ये प्रचंड गर्दी जमा झाली. डीजे मुळे युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. रात्री दहा वाजेच्या दरम्यान गणेश विसर्जन मिरवणूक समाप्त झाली.