परभणी : तालुक्यातील पारवा शेत शिवारामध्ये २ जानेवारीला रात्री महिलेवर सामूहिक अत्याचार अन् सशस्त्र दरोड्याची घटना घडली होती. या प्रकरणात जिल्हा पोलीस दलाच्या एलसीबी आणि संलग्न पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एका आरोपीस ताब्यात घेतले. त्याची ओळख परेड सोमवारी करण्याची प्रक्रिया सुरू होती.
तालुक्यातील पारवा शेत शिवारामध्ये आखाड्यावर अज्ञात चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. घटनेत एकाच कुटूंबातील एकूण तिघे जण जखमी झाले होते. या प्रकरणामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस अधीक्षक यांनी आरोपी शोधासाठी नऊ पथके स्थापन केली होती. यामध्ये गुन्ह्यातील एका आरोपीला परजिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. संबंधित ताब्यात घेतलेला आरोपी हा अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. आता पुढील आरोपींचा शोध सुरू आहे. यात अजून आठ ते नऊ आरोपींचा समावेश असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी अजूनही पथके पर जिल्ह्यात सक्रिय आहेत. आरोपीची ओळख परेड झाल्यानंतर त्यास परभणी जिल्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख, एलसीबी पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, सपोनि. राजू मुत्येपोड, पांडुरंग भारती, पोलीस कर्मचारी मधुकर चट्टे, हनुमंत जक्केवाड, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, शंकर गायकवाड, जमीर फारुकी यांच्यासह पथकाने केली.