परभणी : जिल्ह्यात मागील एका आठवड्यामध्ये तब्बल १ हजार नव्या रुग्णांची भर पडली असून, कोरोनाचा संसर्ग दुपटीने वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर महिन्यापर्यंत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यात हा कोरोना नियंत्रणात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. दोन आठवड्यांपूर्वी दररोज सरासरी १५ ते २० रुग्णांची संख्या होती. ती आता १०० ते १५० वर पोहोचली आहे. मागील आठवड्यात तर दररोज १०० पेक्षा अधिक रुग्णांची नोंद घेण्यात झाली. त्यामुळे कोरोनाची रुग्ण संख्या दुपटीने वाढली असून, त्याचे नियंत्रण करण्यासाठी आता प्रशासनाला कडक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
१३ ते २० मार्च या आठवड्यामध्ये १ हजार १० नवीन रुग्णांची जिल्ह्यात नोंद झाली आहे तर दुसरीकडे २५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांची ही संख्या मागच्या काही महिन्यातील रुग्ण संख्येच्या तुलनेने दुप्पट आहे. या आठवड्यात १७ मार्च रोजी सर्वाधिक २३५ रुग्णांची नोंद झाली आहे. १९ मार्च रोजी २१६ रुग्णांची जिल्ह्याच्या यादीत भर पडली आहे. १३ मार्च रोजी नवीन ४३ रुग्णांची नोंद झाली होती; परंतु त्यानंतर रुग्ण संख्या वाढत जाऊन दोनशेपार झाली आहे.
मृत्यू दर ३.४१ वर
एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे उपचार घेणाऱ्या रुग्णांचा होणारा मृत्यू जिल्हावासीयांसाठी क्लेशकारक ठरत आहे. मागील आठवड्यामध्ये ६ रुग्ण उपचारादरम्यान मृत्यू पावले. जिल्ह्यातील एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ३४७ एवढी आहे. रुग्णांचा मृत्यू दर ३.४१ वर पोहोचला आहे. कोरोना संसर्गामध्ये सरासरी मृत्यू दर २ टक्के असल्याचे सांगितले जाते; परंतु प्रत्यक्षात जिल्ह्याचा मृत्यू दर ३.४१ टक्के असल्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे हा मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९ टक्के
जिल्ह्यात कोरोनाची एकूण रुग्ण संख्या १० हजारांपेक्षा अधिक झाली आहे. त्या तुलनेमध्ये ९ हजार ६१ रुग्ण कोरोनातून बरे झाले असून, बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८९.२५ टक्के एवढे आहे. रुग्णांना बरे करण्याचे प्रमाणही किमान ९५ टक्केपेक्षा अधिक करण्यासाठी प्रयत्नांची गरज निर्माण झाली आहे.
आठवडाभरात नोंद रुग्ण
१९ मार्च : २१६
१८ मार्च : १६६
१७ मार्च : २३५
१६ मार्च : ११६
१५ मार्च : १४७
१४ मार्च : ८७
१३ मार्च : ४३