लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील प्रकल्पांनी तळ गाठला असून, जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये केवळ १४ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पाणीप्रश्न गंभीर होत आहे.मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत ३३ टक्के पाऊस कमी झाल्याने त्याचा परिणाम जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यावर झाला आहे. जिंतूर तालुक्यात गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे या प्रकल्पात पाणीसाठाच झाला नाही. परभणीसह जिंतूर, पूर्णा, हिंगोली शहराला येलदरी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या मात्र प्रकल्प मृतसाठ्यात गेला आहे. त्यामुळे परभणी, पूर्णा या शहरांसाठी सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून पाणी घ्यावे लागत आहे.जिल्ह्यातील चौदा प्रकल्पांमध्ये एकूण ७० दलघमी पाणीसाठा असून, या साठ्यातून किती गावांना पाणी पुरेल, असा प्रश्न निर्माण होत आहे. येलदरी, मासोळी मध्यम प्रकल्प आणि मुळीचा बंधारा पूर्णत: कोरडा पडला आहे. करपरा मध्यम प्रकल्पात १२ टक्के, डिग्रस, मुद्गल व ढालेगाव बंधाऱ्यात प्रत्येकी १३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सेलू येथील निम्न दुधना प्रकल्पातच सर्वाधिक १९.२८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ४५.९४ दलघमी उपयुक्त पाणीसाठा या प्रकल्पात असून, परभणी, पूर्णा, सेलू, मानवत या चार शहरांसह तालुक्यातील अनेक गावांची पाण्याची भिस्त याच प्रकल्पावर अवलंबून आहे. विशेष म्हणजे, आठ दिवसांपूर्वी निम्न दुधनातून नांदेड शहरासाठीही पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाली आहे. या प्रकल्पातील शिल्लक पाणीसाठा लक्षात घेता, हा पाणीसाठा जिल्ह्यासाठीच वापरावा, अशी मागणी होत आहे.
परभणी जिल्ह्यात केवळ १४ टक्के पाणीसाठा शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 11:59 PM