परभणी: जिंतूर पोलिसांनी डिसेंबर २०२० मध्ये दोन घटनांमध्ये जप्त केलेले १४८ कट्टे गहू व तांदूळ हे धान्य रेशनचेच असल्याचा अहवाल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संशोधन केंद्राने पोलिसांना दिला असून, याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिंतूर येथे २४ ऑक्टोबर रोजी पोलीस हवालदार अनिल हिंगोले हे गस्तीवर असताना मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास शहरातून एम.एच.२०- एएन ११६४ क्रमांकाचा ॲपेरिक्षा त्यांना भरधाव वेगाने येताना दिसला. यावेळी संशय आल्याने पोलिसांनी संबंधित वाहन थांबविले व चालकाची चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी या वाहनाची तपासणी केली असता ताडपत्रीखाली झाकून ठेवलेले प्रति किलो ५० चे तांदळाचे ८ व गव्हाचे ६ असे एकूण १४ कट्टे धान्य आढळून आले होते. यावेळी ऑटोचालक जब्बार खा महेबुब खा याच्याकडे धान्याची कागदपत्रांची विचारणा केली असता, त्याने हे धान्य जिंतूर पोस्ट ऑफिसजवळील आगा खान याच्याकडून १ हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकत घेतल्याचे सांगितले, तसेच हे धान्य मंठा येथे व्यापारी कुरेशी यांना विक्रीसाठी नेत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी धान्यासह टेंपो जप्त करून जिंतूर ठाण्याच्या परिसरात आणून उभा केला. याबाबत तहसीलदारांना पत्र देऊन हे धान्य रेशनचे आहे की कसे, याबाबत विचारणा केली गेली. त्यानंतर पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी या धान्याचे नमुने तपासणीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संशोधन विभागाकडे पाठविले. संशोधन विभागाने २२ फेब्रुवारी रोजी या संदर्भातील अहवाल सादर केला. त्यामध्ये सदरील धान्य हे शासकीय वितरण प्रणालीतील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर याप्रकरणी पोलीस कर्मचारी अनिल हिंगोले यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी जब्बार खान महेबुब खान पठाण व आगा खा याच्याविरुद्ध १० मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१३४ कट्टेही रेशनचेच
जिंतूर पोलिसांनी १ डिसेंबर रोजी शहरातून एका शेडमधून तांदळाचे १३४ कट्टे जप्त केले होते. यावेळी उपस्थित मोहसीन मोईन कुरेशी यास विचारणा केली असता त्याने हा माल मोबीन मोईन कुरेशी याने जमा केला असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी हे शेड सील केले. तत्पूर्वी येथील धान्याचे नमुने तपासणीसाठी घेऊन ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संशोधन विभागाकडे पाठविले. याबाबतचा अहवाल २२ फेब्रुवारी रोजी पोलिसांना प्राप्त झाला. त्यामध्ये शेडमधील तांदळाचे नमुने शासकीय वितरण प्रणालीतील असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत पोलीस कर्मचारी अनिल हिंगोले यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मोईन कुरेशी व मोहसीन कुरेशी (दोघे. रा. भोगाव) याच्याविरुद्ध १० मार्च रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.