परभणी : जिल्ह्यातील १ हजार ७७१ नागरिकांच्या स्वॅब आणि रॅपिड टेस्टचा अहवाल २ डिसेंबर रोजी प्राप्त झाला असून, त्यात केवळ १८ जणांचेच अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
मागील एक महिन्यापासून कोरोना आटोक्यात आला आहे. मात्र, तपासण्यांची संख्या कमी असल्याने रुग्णांची संख्या कमी असेल, अशी शंका मनात येत होती. मात्र, बुधवारी १ हजार ७७१ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात १ हजार ७५३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून केवळ १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील २१ रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात आता एकूण ७ हजार १६१ रुग्ण झाले असून, त्यापैकी ६ हजार ७१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. २८९ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या १५४ रुग्ण उपचार घेत आहेत.
कुठे आढळले रुग्ण?
परभणी शहरातील खानापूरनगर, अंबिकानगर, मुमताज कॉलनी, काद्राबाद प्लॉट, डॉ. झाकीर हुसेन महाविद्यालय परिसर, गालीब नगर, माऊलीनगर, जनप्रिय कॉलनी, ज्ञानेश्वरनगर, संगम कॉलनी, सेलू शहरातील कस्तुरबा गांधी विद्यालय परिसर, जिंतूर तालुक्यातील गडदगव्हाण, वस्सा, कौसडी (२), पालम आणि हिंगोली जिल्ह्यातील टाकळगाव येथे रुग्णांची नोंद झाली आहे.