यावर्षीच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पिकाचे अतिवृष्टी व सततच्या पावसाने मोठे नुकसान झाले. ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे आपली पिके संरक्षित केली होती. मात्र, नुकसान होऊनही या कंपनीने केवळ १८ हजार शेतकऱ्यांनाच ११ कोटी रुपयांची मदत केली. त्यामुळे यावर्षीच्या रब्बी हंगामात आतापर्यंत १ लाख ४० हजार ५४६ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी करूनही केवळ २५ हजार ७७० हेक्टरवरील पिके रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे संरक्षित केली आहेत. त्यामुळे खरिपात पिकांच्या नुकसानीची मदत न दिल्यामुळेच यावर्षी ३९ हजार ८४७ शेतकऱ्यांनीच पीक विमा काढला आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी आपली पिके संरक्षित करण्याकडे पाठ फिरवली आहे.
१२३ कोटींचा भरला हप्ता
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३९ हजार ८४७ शेतकऱ्यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे २५ हजार ६७० हेक्टर संरक्षित करून १ कोटी २३ लाख २० हजार ९५७ रुपयांचा शेतकरी हप्ता भरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी २५ टक्के शेतकऱ्यांनीसुद्धा आपली पिके नुकसानीपासून संरक्षित केली नाहीत. त्यामुळे विमा कंपन्यांवर आता शेतकऱ्यांचा विश्वास राहिला नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची प्रतीक्षा
यावर्षीच्या खरीप हंगामात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे सोयाबीन व कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे राज्य शासनाने या शेतकऱ्यांना मदत देऊ केली. यामध्ये पहिल्या टप्प्यातील अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांना मिळाले असले तरी दुसऱ्या टप्प्यातील अनुदानासाठी प्रशासन पातळीवर कोणतीही हालचाल दिसून येत नाही. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.