खरीप हंगाम २०२१- २२ मध्ये जिल्ह्यातील ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, तूर आदी पिकांची पेरणी केली आहे. जूनमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांची पिके चांगलीच बहरली. मात्र, जुलै महिन्यात जिल्ह्यात पावसाने सतत २१ दिवस खंड दिल्याने बहरात असलेल्या सोयाबीन पिकाला निसर्गाच्या अवकृपेचा मोठा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन उत्पादनात मोठी घट होणार असल्याने शेतकरी अडचणीत सापडला. त्यामुळे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सोयाबीन पिकाच्या पीक परिस्थितीचा अहवाल, पर्जन्यमान अहवाल, स्थानिक प्रसारमाध्यमांचा अहवाल, दुष्काळसदृश परिस्थिती या आधारे अपेक्षित उत्पादन हे त्या पिकाच्या उत्पादनाच्या ५० टक्केपेक्षा कमी आहे. असे जिल्ह्यातील २३ महसूल मंडळांत निदर्शनास आल्यामुळे नुकसानभरपाई पात्र असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे सोयाबीनच्या संभाव्य नुकसानभरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत विमाधारक शेतकऱ्यांना देण्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला आदेशित करण्यात आले आहे. ही रक्कम अधिसूचना जाहीर झाल्यापासून विहित मुदतीत संभाव्य नुकसानभरपाई रकमेच्या २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ५२ पैकी केवळ २३ मंडळांतील शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत २५ टक्के अग्रीम रक्कम मिळणार आहे.
५ टक्के क्षेत्राचे नजरअंदाज सर्वेक्षण
सोयाबीन पेरणी क्षेत्राच्या ५ टक्के क्षेत्राचे नजरअंदाज सर्वेक्षण करण्यासाठी उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये संबंधित मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक, तलाठी, विमा कंपनीचे प्रतिनिधी, स्थानिक शेतकरी प्रतिनिधी या समितीचे सदस्य आहेत. या समितीकडून शुक्रवारपर्यंत बाधित क्षेत्राची पाहणी करून अहवाल सादर करावा, दिरंगाई करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना दिले होते. मात्र, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ५ टक्के क्षेत्राचा नजर अंदाज सर्वेक्षण अहवाल कृषी कार्यालयाकडे प्राप्त झाला नसल्याची माहिती मिळाली.
या मंडळांचा समावेश
परभणी तालुक्यातील झरी, जांब, परभणी, गंगाखेड तालुक्यातील माखणी, राणीसावरगाव, गंगाखेड, पाथरी तालुक्यांतील बाभळगाव, हादगाव, कासापुरी, पाथरी, जिंतूर तालुक्यातील आडगाव, बोरी, पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर, पालम तालुक्यांतील चाटोरी, बनवस, पालम, सेलू तालुक्यातील वालुर, मोरेगाव, देऊळगाव गात, कुपटा, सोनपेठ तालुक्यातील वडगाव व मानवत तालुक्यातील मानवत या २३ मंडळांचा सोयाबीन पिकाच्या अग्रीमसाठी समावेश झाला आहे.