परभणी : रेल्वे स्थानकावरील रखडलेल्या प्रश्नांसंदर्भात दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी बुधवारी परभणी दौ-यात मागील आश्वासनांचाच पुनरुच्चार केला़ १५ डिसेंबरपर्यंत परभणी स्थानकावरील एक्सलेटर आणि लिफ्टचे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याने आता प्रवाशांना १५ डिसेंबरपर्यंतची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
परभणी रेल्वे स्थानकावर अनेक असुविधा आहेत़ अरुंद दादरा, सरकता जिना (एक्सलेटर), लिफ्ट हे प्रश्न मागील वर्षभरापासून रखडले आहेत़ मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ वेळोवेळी या प्रश्नांविषयी पाठपुरावा करीत आहे़ बुधवारी नांदेड विभागाचे रेल्वे व्यवस्थापक डॉ़ अखिलेश सिन्हा यांनी स्वतंत्र रेल्वेने नांदेड-परळी मार्गावरील रेल्वे स्थानकांची तपासणी केली़ सकाळी १० वाजेच्या सुमारास डॉ़ सिन्हा परभणीत पोहचले़ संपूर्ण स्थानकाची पाहणी केल्यानंतर त्यांनी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या पदाधिका-यांसोबत चर्चा केली़ यावेळी स्थानकावरील समस्या त्यांच्यासमोर मांडल्या़ त्या यापूर्वीही अनेक वेळा मांडल्या होत्या़ त्यामुळे या वेळच्या दौ-यात रेल्वे प्रबंधकांनी मागील दौ-यात दिलेली आश्वासनेच यावेळीही दिली़ परभणी रेल्वे स्थानकावर १५ डिसेंबरपूर्वी लिफ्ट आणि सरकता जिना बसविला जाईल, असे त्यांनी सांगितले़
पोखर्णी रेल्वे स्थानकावर वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता या स्थानकावर रेल्वेचे थांबे बंद केले जातील, रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणानंतर रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडून गेले आहे़ यावेळा पत्रकात सुसूत्रता आणण्यासाठी या मार्गावरून धावणा-या रेल्वेचा वेग ५० किमी प्रतितासावरून ८० किमी प्रतीतास केला जाईल, असेही त्यांनी सांगितले़ यावेळी रेल्वेचे इतर अधिकारी उपस्थित होते़ रेल्वे प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, सुरेश नाईकवाडे, रितेश जैन आदींनी त्यांच्याशी चर्चा केली़
हायकोर्टला वाढविणार डबेधर्माबाद-मनमाड या मराठवाडा एक्सप्रेस (हायकोर्ट) रेल्वेला प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेचे कोच वाढवावेत, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली़ या रेल्वेला सध्या १६ कोच (डबे) असून, दोन डबे वाढविण्याचे आश्वासन त्यांनी दिले़ पनवेल एक्सप्रेस गाडीला गंगाखेड येथे थांबा देण्याच्या मागणीवर मात्र हा प्रश्न माझ्या अखत्यारित नसल्याचे त्यांनी सांगितले.