परभणी : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्याविरुद्ध महाविकास आघाडीच्या खासदार, आमदारांनी रान उठवत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्र्यांकडून निधी वाटपात दुधाभाव करण्यात येत असून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनाच अधिक महत्त्व दिले जात असल्याचे असल्याचा आरोप यावेळी महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींकडून करण्यात आला. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा नियोजन समितीचे बैठक पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या बैठकीच्या प्रारंभीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव, आ.डॉ. राहुल पाटील आणि काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांनी निधी वाटपावरून पालकमंत्री डॉ. सावंत यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. गेल्या सहा महिन्याच्या काळात निधी वाटपामध्ये दुजाभाव होत असून आमच्या मतदारसंघातील विकास कामांना अपेक्षित निधी मिळत नसल्याचा आरोप विरोधी गटाच्या लोकप्रतिनिधींनी केला. याउलट जिल्ह्यातील जिंतूर, गंगाखेड या दोन मतदारसंघात अपेक्षित कामे आणि निधी दिल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला. दोन मतदारसंघालाच वाव अन् जिल्ह्यातील इतर ठिकाणी दुधाभाव हाेत असल्याचे खासदार जाधव यांनी केला. जिल्हा नियोजन समितीचा निधी वितरणादरम्यान परस्पर धोरण ठरवले जात असून विश्वासात न इतिवृत्तांत लिहिल्या जात आहे. त्यामुळे जिंतूर, गंगाखेड वगळता इतर ठिकाणी विकास कामे होत नसल्याची स्थिती आहे. यावर पालकमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन आगामी काळात संबंधित ठिकाणी सुद्धा अपेक्षित निधी दिला जाईल, असे स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्र्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांच्या ध्येयधोरणावर टीका केली. चालू बिल भरल्यानंतर शेतकऱ्यांची कट केलेली वीज पुन्हा जोडून देण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहे. परंतु त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात होत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहे. त्यामुळे महावितरणच्या अधिकार्यांनी याची दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय देत तातडीने वीज जोडणी करून देण्याच्या निर्देश डॉ. सावंत यांनी दिले.