अनेक गावांत लाईनमन नाही
देवगाव फाटा : सेलू तालुक्यात अनेक गावांत लाईनमन नाहीत. जे आहेत त्यांनी कामासाठी खासगी माणसं लावलेली आहेत. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. आधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
जिल्हा रुग्णालयाला वाहनांचा गराडा
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांचा सर्रास वावर वाढला आहे. त्यामुळे रुग्ण व नातेवाइकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर रुग्णवाहिकाही रस्त्यातच लागत असल्याने गैरसोय वाढली आहे.
जिंतूर रस्त्यावर अपघात वाढले
परभणी : परभणी- जिंतूर या महामार्गाचे काम मागील दोन वर्षापासून सुरू आहे. जागोजागी खोदकाम केल्याने रात्री-अपरात्री भरधाव वेगाने येणाऱ्या परजिल्ह्यातील वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दिवसेंदिवस अपघात वाढत आहेत.
परळी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवासी त्रस्त
सोनपेठ : परळी रोडवर कालव्यावरील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. पाथरी रोडवर तहसील कार्यालय ते शिवाजी चौकापर्यंतही मोठ्या प्रमाणात खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. खड्डे दुरुस्तीची मागणी होत आहे.