परभणी : जिल्हा पोलिस दलाने ८ ते २४ डिसेंबर या १७ दिवसांच्या कालावधीत ऑपरेशन मुस्कान अंतर्गत विशेष मोहीम राबविली. यामध्ये जिल्ह्यातील ७५ पीडितांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
जिल्ह्यातील अपहृत झालेली मुले, मुली, हरवलेल्या महिला, पुरुष यांच्या आढावा पोलिस अधीक्षक रागसुधा. आर. यांनी घेतला. यामध्ये सन २०२२ व २०२३ मधील शोध न लागलेल्या पीडितांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत विशेष मोहीम राबविली. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या. यामध्ये पोलीस ठाणेनिहाय पथके तयार करून या विभागाने आठ ते २४ डिसेंबर दरम्यान जिल्ह्यातील ७५ पीडितांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन केले. यामध्ये परभणी ग्रामीण ठाण्यातील दाखल असलेल्या गुन्ह्यात दोन अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन त्यांना मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले. सोबतच नानलपेठ, नवा मोंढा, सोनपेठ अशा विविध ठिकाणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील अल्पवयीन मुली, तसेच बालकाचा शोध घेत त्यांना शोधण्यात आले.
अपहृत चार मुले, दोन मुलींना आणले परतयामध्ये ऑपरेशन मुस्कान अंतर्गत अपहरण झालेले चार मुले व दोन मुलींचा, तर हरवलेल्या ३३ पुरुष व ३६ महिलांचा शोध घेऊन त्यांना नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस दलाने दिली.